जिंतूर : येथील जवाहर प्राथमिक विद्यालयात मातृ-पितृ पूजन दिन संपन्न झाला. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून लोक व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. परंतू आपल्या आई-वडिलांप्रती ऋणभाव व्यक्त करण्याकरता मुख्याध्यापक मते यांच्या मार्गदर्शनाखाली मातृ-पितृ पूजन दिन हा अभिनव उपक्रम विद्यालयात राबविण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मते होते तर प्रमुख पाहुणे म्हणून योग वेदांत समिती परभणीचे वरपे, पालक प्रतिनिधी संजय गायके उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. याप्रसंगी विद्यालयात मोठ्या प्रमाणावर माता-पालक उपस्थित होते. त्यांचे या दिनाचे औचित्य साधून पूजन करण्यात आले. यावेळी योग वेदांत समिती परभणीचे वरपे यांनी वेगवेगळे श्लोक म्हणत मंत्रोच्चार करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या आई – वडिलांचे पूजन केले व आरतीही केली.
याप्रसंगी मुख्याध्यापक मते यांनी आपल्या संस्कृती मधील विविध साधू संत, देव देवतांचे दाखले देत आई-वडिलांचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगितले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आई-वडिलांची तसेच आजी-आजोबांची देखील सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन केले. सूत्रसंचालन श्रीमती अलका परणे, आभार रामकिशन टाके यांनी मानले. या कार्यक्रमास शाळेतील सहशिक्षक शिवाजी ठोंबरे, अमोल राऊत, विष्णू रोकडे, श्रीमती अनुजा कामारीकर, कविता वैष्णव, रोहिणी बारहाते यांनी सहकार्य केले.