17.7 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeराष्ट्रीयशेतक-यांचा मोर्चा रोखण्यासाठी १४४ लागू ; हरियाणामध्ये अलर्ट

शेतक-यांचा मोर्चा रोखण्यासाठी १४४ लागू ; हरियाणामध्ये अलर्ट

मोबाईल इंटरनेट बंद रस्त्यांवर सिमेंट ब्लॉक

नवी दिल्ली : पंजाब आणि हरियाणामधील २०० हून अधिक शेतकरी संघटना एकत्र आल्या असून त्यांनी शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी ‘चलो दिल्ली’चा नारा दिला आहे. १३ फेब्रुवारी रोजी हा मोर्चा दिल्लीत नेण्याचे संघटनांचे नियोजन आहे.

हरियाणा आणि पंजाबमधील अनेक शेतकरी संघटना एमएसपी मिळावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू व्हाव्यात अशा काही मागण्यांसाठी १३ फेब्रुवारी रोजी दिल्लीत धडकणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने खबरदारीचे उपाय घेतले असून वाहतूक अडविण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गाचा वापर अतिआवश्यकता असेल तेव्हाच करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सात जिल्ह्यांमध्ये मोबाईलचे इंटरनेट बंद करण्यात आले आहे. दिल्ली सीमेवरील चौक्यांवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून रस्त्यावर खिळे ठोकण्यात आले आहेत. सिमेंट ब्लॉक उभारून शेतकरी संघटनांचा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या अंबाला, कुरुक्षेत्र, कैशल, जिंद, हिसार, फतेहबाद आणि सिरसा या जिल्ह्यांमध्ये १३ फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजेपर्यंत मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

हरियाणा पोलिसांनी काल अंबाला जिल्ह्यातील घग्गर नदीवर असलेल्या पुलावर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सिमेंट ब्लॉक आणि मेटल शीट (रस्त्यावरील खिळे) उभारल्या आहेत. शेतक-यांनी ट्रॅक्टरद्वारे महामार्गावर येऊ नये, यासाठी घग्गर नदीचे पात्रही खोदण्यात आले होते, अशीही माहिती अधिका-यांनी दिली. तसेच पोलिसांनी जिंद आणि फतेहबाद जिल्ह्यांतील पंजाब-हरियाणा सीमा बंद करण्यासाठी सर्व उपाययोजना राबविल्या आहेत. प्रवाशांना वाहतुकीचा त्रास होऊ नये, यासाठी गरज असेल तरच वाहतूक करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा यांनी एकत्रितपणे २०० हून अधिक शेतकरी संघटनांना एकत्र करून १३ फेब्रुवारी रोजी दिल्लीत धडकण्याची योजना बनविली होती. शेतमालाला हमीभाव मिळण्याचा कायदा करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात आणि इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे शेतकरी संघटनांच्या वतीने सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR