मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी नेत्यांचे गुंडांसोबत होणा-या भेटीचे फोटो ट्वीट करणा-या संजय राऊत यांनी आज देखील असाच एक फोटो ट्वीट केला आहे. संजय राऊत यांनी आज सलग ७ वा फोटो शेअर केला आहे. ‘पेहचान कौन.. हे लाल सिंग महोदय आहेत. खंडणी.. अपहरण..अशा सध्या किरकोळ ठरवल्या गेलेल्या गुन्हातील आरोपी’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो संजय राऊत यांनी शेअर केला आहे.
‘टीम मिंधेचे खास मेंबर..काय करणार तुम्ही? गुंडांनी गुंडांसाठी चालवलेले राज्य!’, असे म्हणत राऊत यांनी सत्ताधा-यांवर हल्लाबोल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुंडांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. तसेच राज्यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबार, हत्येसारख्या घटना घडत आहेत, त्यामुळे विरोधकांनी सत्ताधा-यांवर टीका केली आहे.
‘सामना’तून हल्लाबोल
‘पंतप्रधान मोदी नैतिकतेच्या गप्पा मारतात, पण महाराष्ट्रासारख्या राज्यात त्यांच्या आशीर्वादाने गुंडांचे राज्य सुरू आहे. त्यावर भाजपवाले गप्प आहेत. महाराष्ट्रातील कंत्राटदार, व्यापारी, दुकानदार सरकारी गुंडांना खंडणी देऊन थकले आहेत. मंत्रालयात व मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गुंड टोळ्यांबरोबर बैठका होतात. हे गंभीर वाटत नाही काय?’, असा सवाल त्यांनी ‘सामना’च्या ‘रोखठोक’ सदरातून उपस्थित केला आहे.