25.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयएकाचवेळी २० महिलांवर सामूहिक बलात्कार

एकाचवेळी २० महिलांवर सामूहिक बलात्कार

जयपूर : राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाचवेळी २० महिलांवर सामूहिक बलात्काराचा प्रकार समोर आला आहे. यापैकी एका महिलेने पोलिसांत धाव घेतल्याने हे प्रकरण बाहेर आले आहे. सिरोही नगर परिषदेच्या सभापती आणि तत्कालीन आयुक्तांविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंगणवाडी सेविका बनवण्याच्या नावाखाली सभापती महेंद्र मेवाडा आणि तत्कालीन आयुक्त महेंद्र चौधरी यांनी तक्रारदार महिलेसह १५ ते २० महिलांना बोलविले होते. त्यांना खायच्या पदार्थातून गुंगीचे औषध देण्यात आले. यानंतर मेवाडा आणि चौधरी यांच्यासह त्यांच्या सहका-यांनी या महिलांवर गँगरेप केला, या महिलांचा व्हीडीओ काढून त्यांना ब्लॅकमेलही करण्यात येत असल्याचा आरोप या पीडित महिलेने केला आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वी ही महिला अंगणवाडीत काम करण्यासाठी तिच्या सहकारी महिलांसोबत सिरोही येथे आली होती. नोकरी मिळविण्यासाठी त्यांनी त्यांनी अध्यक्ष आणि आयुक्तांची भेट घेतली होती. या दोघांनी त्यांच्या ओळखीने एका घरात राहण्याची आणि जेवणाची सोय केली. या जेवणात त्यांना गुंगीचे औषध देण्यात आले होते. महिला बेशुद्ध झाल्यावर त्यांच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

शुध्दीवर आल्यावर कळाली घटना
महिलांना जेव्हा शुद्ध आली तेव्हा त्यांचे डोके दुखत होते, त्यांच्या अंगावरील कपडे अस्तव्यस्त झाले होते. तिथे सभापती व आयुक्त होते. त्यांच्यासोबत १०-१५ साथीदार होते. त्यांना विचारले असता हे सर्व लोक हसायला लागले. याचसाठी तुम्हाला इथे बोलावले होते, असे सांगितले गेले. महिलांना त्यांच्यासोबत काय घडले याची कल्पना आली होती. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर त्यांचे व्हीडीओ काढून पाच पाच लाख रुपये मागितले जात होते. नाहीतर व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती.

पोलिस म्हणतायत तक्रार खोटी
याचबरोबर अन्य लोकांसोबतही शरीर संबंध बनविण्यास भाग पाडले जात होते. या आरोपींनी नोकरीचे आमिष दाखवून या महिलांकडून कोरे कागद आणि स्टँप पेपरवर सह्याही घेतल्या आहेत. या महिलांनी सिरोही पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ती खोटी असल्याचे आढळून आले होते, असे डीवायएसपी पारस चौधरी यांचे म्हणणे आहे. आता यापैकी ८ महिला या राजस्थान हायकोर्टात गेल्या आहेत. तिथून गुन्हा दाखल करण्याचे आदेश आल्याचे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR