24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसंपादकीयपाकमध्ये संभ्रमावस्था

पाकमध्ये संभ्रमावस्था

भारताचा शेजारी पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी संसदेसाठी (नॅशनल असेंब्ली) मतदान पार पडले नि लगेच मतमोजणीला सुरुवात झाली. जाहीर झालेल्या निकालानुसार कोणत्याच राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने कोणाचे सरकार येणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पाकमधील तीन प्रमुख पक्षांकडून आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या ‘पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज’ने बिलावल भुट्टो यांच्या ‘पाकिस्तान पीपल्स पक्षा’सोबत बोलणी सुरू केली आहे. नवाज शरीफ पक्षाला ७५ तर बिलावल भुट्टो यांच्या पक्षाला ५४ जागा मिळाल्या आहेत. सध्या तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) समर्थक अपक्षांना सर्वाधिक १०१ जागांवर विजय मिळाला आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीपूर्वीच इम्रान खान यांना निवडणूक लढवण्यास बंदी केली होती.

त्यांच्या पक्षाचे क्रिकेट बॅट हे निवडणूक चिन्ही गोठविले होते. त्यामुळे या पक्षाचे जे उमेदवार होते त्यांनी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविली होती. जर इम्रान खान यांचा पक्ष त्यांच्या निवडणूक चिन्हावर लढला असता तर त्यांना निश्चितच बहुमत मिळाले असते, असे सध्याचे चित्र आहे. परंतु आता १०१ अपक्ष उमेदवार निवडून आल्याने सरकार स्थापन करण्याबाबत अनेक अडचणी येणार आहेत. हे सर्व अपक्ष एखादी आघाडी म्हणून निवडणूक लढवीत नव्हते त्यामुळे पाकिस्तानच्या घटनेचा विचार करता सर्वांत मोठा राजकीय पक्ष म्हणून नवाज शरीफ यांच्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी बोलाविले गेल्यास आश्चर्य वाटायला नको. पाकमध्ये एखादे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न जरी मतदानाच्या माध्यमातून झाले असले तरी अद्याप या प्रक्रियेला पूर्णविराम मिळण्यासाठी बराच कालावधी लागेल असे दिसते. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत एकूण ३३६ जागा आहेत. त्यांपैकी २६५ जागांसाठी निवडणूक झाली.

एका जागेवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली तर एका जागेचा निकाल नियमभंगामुळे पुढे ढकलण्यात आला. येथे १५ फेबु्रवारीला पुन्हा मतदान होणार आहे. उर्वरित ७० जागा महिलांसाठी राखीव आहेत. सत्ता स्थापनेसाठी १३३ हा बहुमताचा आकडा आहे. इम्रान खान यांचे पीटीआय समर्थक १०१ अपक्ष निवडून आल्याने त्यांना सत्ता स्थापनेसाठी ३२ सदस्यांची गरज आहे. नवाज शरीफ आणि बिलावल भुट्टो यांनी आघाडी सरकार स्थापण्याबाबत आधीच चर्चा सुरू केली आहे. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या तीन ते चार उमेदवारांनी नवाज शरीफ यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पाकच्या लोकशाहीचा आजवरचा इतिहास पाहता नेहमीच तेथील लष्कर आणि लष्करप्रमुख महत्त्वाची भूमिका बजावीत असतात. पाकचे लष्करप्रमुख जनरल मुनीर यांनी इम्रान खान यांना आणि त्यांच्या पक्षाला विरोध केला आहे. जनरल मुनीर यांनी नवाज शरीफ आणि इतर राजकीय पक्षांनी एकत्र येऊन पाकिस्तानचे हित लक्षात घेऊन सरकार स्थापन करावे, अशी सूचना केली आहे. इम्रान खान यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दीर्घ काळानंतर पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झालेल्या नवाज शरीफ आणि बिलावल भुट्टो यांना एकत्र यावे लागेल.

त्यासाठी त्यांना काही त्यागही करावा लागेल. देशात पुन्हा परतल्यानंतर सहानुभूतीच्या लाटेवर आपण पुन्हा सत्तारूढ होऊ, असे नवाज शरीफ यांना वाटले होते तर इम्रान खान यांच्याशी थेट स्पर्धा नसल्याने मतदार आपल्या पाठीशी राहतील, असे बिलावल भुट्टो यांना वाटले होते. उलट तुरुंगात राहून निवडणुकीची यंत्रणा राबविणा-या इम्रान खान यांनाच सहानुभूतीचा फायदा मिळाला. या निकालामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा राजकीय लाभ उठविण्यासाठी इम्रान खान यांना राजकीय कौशल्य दाखवावे लागणार आहे. लष्कराचा पाठिंबा नसल्याने पाकच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याचा चमत्कार इम्रान खान यांना करून दाखवावा लागणार आहे. काही वर्षांपूर्वी अपमानित होऊन नवाज शरीफ यांना देश सोडावा लागला होता. ते आता पुन्हा सन्मानाने पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावर विराजमान होण्याचे स्वप्न पाहात आहेत. स्वप्नपूर्तीसाठी त्यांना बिलावल भुट्टो यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल. परंतु नॅशनल असेंब्लीमधील बलाबल पाहता आघाडी सरकारचा कारभार चालविताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. पाकमधील लोकशाही प्रक्रिया कशाही प्रकारे वाकविण्यात तेथील राजकीय नेते तरबेज असले तरी तेथील मतदार मात्र जागरूक असल्याचे दिसून आले आहे.

एक मात्र खरे की, पाकमध्ये कोणाचीही सत्ता येवो, त्यांना लष्कराशी हातमिळवणी करावीच लागते. म्हणजेच सत्ता स्थापनेत आणि उलथवून टाकण्यात लष्कराचा मोठा हात असतो. पाकिस्तानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सुमारे १२ कोटी मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. या पार्श्वभूमीवर देशभरात सुमारे साडेसहा लाख सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. भारतात पंतप्रधान मोदी घराणेशाहीला कडाडून विरोध करतात पण पाकमधील चित्र वेगळे आहे. तेथे गत काही वर्षांपासून राजकीय सत्ता काही निवडक कुटुंबांच्याच हातात आहे. दोन मुख्य घराणी म्हणजे नवाज शरीफ यांचे कुटुंब आणि भुट्टो कुटुंब. राजकीय पक्षांमधील लोकशाही व्यवस्थेच्या अभावामुळे पाकिस्तानमध्ये घराणेशाहीचे राजकारण फोफावत असल्याचे दिसून येते. पाकमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या अनेक अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीच्या निकालास न्यायालयात आव्हान दिले आहे. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा त्यांचा आरोप आहे. सध्या तरी पार पडलेली निवडणूक पाकला अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या भोव-यातून बाहेर काढून स्थैर्य प्रदान करील आणि कंगाल झालेल्या देशाला विकासाच्या वाटेवर घेऊन जाईल ही सर्वसामान्यांची अपेक्षा फोल ठरते की काय, अशी भीती वाटते. नेमके काय होईल ते काळच ठरवेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR