मुंबई : प्रतिनिधी
मागील काही वर्षात अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सतत शेतक-यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. अशात अवकाळी हवामान परिस्थिती आणि हवामानाचा होणारा बदल यापासून शेतक-यांना आपल्या पिकांचे नुकसान कमी करता यावे, यासाठी जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राची स्थापना करण्यात आली. यामुळे शेतक-यांना हवामानाचा अंदाज मिळायचा. मात्र, आता हे सर्व कृषी हवामान केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा मोठा फटका शेतक-यांना बसणार आहे.
अवकाळी हवामान परिस्थिती आणि हवामानाचा होणारा बदल यापासून शेतक-यांना आपल्या पिकांचे नुकसान कमी करता यावे किंवा टाळता यावे, यासाठी भारतीय हवामान विभाग आणि कृषी संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने २०१८ मध्ये संपूर्ण देशभर १९९ जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राची स्थापना करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील ११ कृषी हवामान केंद्राचा समावेश होता. कृषी हवामान तज्ज्ञ आणि कृषी हवामान निरीक्षक अशी दोन पदे केंद्रामध्ये भरण्यात आली होती. या माध्यमातून त्या-त्या जिल्ह्यातील शेतक-यांना हवामान आधारित पाच दिवसीय कृषी सल्ला देण्यात येत होता. त्याचा शेतक-यांना आपल्या पिकाचे नुकसान टाळण्यासाठी फायदा होत होता.
देशातील ३० कोटी शेतक-यांचे नुकसान
देशातील हे सर्व १९९ केंद्र बंद करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. त्यामुळे देशातील ३० कोटी शेतक-यांचे नुकसान होणार आहे. या केंद्रांवर कार्यरत असलेले ३९८ कर्मचारी, अधिकारी आता न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकारकडे हे केंद्र सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.