लखनौ : लगीनसराईला सुरुवात झाली आहे. आजूबाजूला एखादे लग्न असेल तर अनेकजण न बोलावताही उपस्थिती लावतात. वरपक्ष अथवा वधूपक्षाचे काही देणेघेणे नसतानाही अनेक जण लग्नात येतात जेवण करतात आणि कलटी मारतात. तुम्हाही अशी चूक करत असाल तर सावधान… कारण या छोट्या चुकीमुळे तुम्हाला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
होय… एखाद्या कार्यक्रमाला आमंत्रण नसताना उपस्थिती लावल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो. इतकेच नाही तर दोन वर्ष तुरुंगात जावे लागू शकते. गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये लग्नाला न बोलवता गेल्यामुळे दोन जणांना अटक करण्यात आली.
लग्नात मोफत जेवण केल्यामुळे दोन जणांना उत्तर प्रदेशमध्ये अटक करण्यात आली. फुकटात जेवण करणे या दोघांना महागात पडले. झाले असे की, लखनौमध्ये एका लग्नात दोन जणांनी हजेरी लावली. त्यानंतर पोटभर जेवणही केले अन् बिनधास्त डान्स केला. त्यांचा डान्स पाहिल्यानंतर लग्नातील काही लोकांना त्यांच्यावर संशय आला. काही जणांनी त्या दोघांना ताब्यात घेतले आणि पोलिसांना बोलवले. त्यांची विचारपूस केली असता ते लग्नातील दोन्ही बाजूकडच्या कुणाच्याच ओळखीतले नव्हते. पोलिसांनी त्या दोघांना अटक केली. त्यानंतर त्यांची रवानगी थेट तुरुंगात झाली.
कायदा काय सांगतो?
जर तुम्ही लग्नसमारंभात आमंत्रणाशिवाय जाऊन जेवणावर ताव मारण्याचा विचार करत असाल तर थांबा.. अशी चूक तुम्हाला महागात पडू शकते. तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो. याबाबत वकील उज्ज्वल त्यागी यांनी सोशल मीडियावर माहिती देताना सांगितले की, जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमात न बोलावता जात असाल तर हा गुन्हा आहे. तुमच्यावर भादवि कलम ४४२ आणि ४५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. यामध्ये दोन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो. लग्नसमारंभात न बोलवता जाणे ट्रेसपासिंगचा प्रकार आहे.