मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेशानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी आज बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेस नेत्यांनी टीका केली. बाळासाहेब थोरात यांनी अशोक चव्हाणांवर टीका करताना म्हटल्े की, दबावामुळे किंवा स्वार्थासाठी ते भाजपमध्ये गेले आहेत.
बाळासाहेब थोरातांची टीका
भारतीय जनता पक्षामध्ये अशोक चव्हाण गेले आहेत. टायमिंग पाहिला तर दिल्लीत शेतक-यांवर लाठीचार्ज, अश्रूधूर सुरु होता तेव्हा त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होत होता. अशोक चव्हाणांच्या वडिलांना काँग्रेसने खूप संधी दिली. त्यानंतर त्यांचे चिरंजीव म्हणून काँग्रेसने अशोक चव्हाण यांना देखील खूप संधी दिली. आता काँग्रेसच्या तत्वज्ञानात असा कोणता दोष निर्माण झाला, ज्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी केला.
अशोक चव्हाण यांच्यावर कोणता दबाव होता का? कोणत्या तरी दबावामुळे किंवा स्वार्थासाठी ते भाजपमध्ये गेले आहेत, असा घणाघात थोरात यांनी केला. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी देखील अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. काँग्रेसने अशोक चव्हाण यांना खूप काही दिले. मग त्यांनी काँग्रेस का सोडली? काँग्रेस सोडण्यामागचे त्यांनी कारण स्पष्ट करावे, असे ते म्हणाले.
नाना पटोलेंनी साधला निशाणा
१५ तारखेला काँग्रेस पक्षाची मिटिंग आहे. १७ तारखेपासून दोन दिवसाचे शिबिर लोणावळ्यात आहे. त्याला काँग्रेसचे सर्व आमदार उपस्थित राहतील. आम्ही सर्व आमदार एकत्र आहोत. नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. सगळे नांदेडचे लोक आमच्याकडे येत आहेत. आम्हाला उमेदवार द्या, त्याला आम्ही निवडून देऊ असे ते सांगत आहेत. आमच्याकडे उमेदवार देखील आहेत, असे नाना म्हणाले.