लातूर : हरितऊर्जा निर्मितीला प्राधान्य देत घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती पॅनल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वत: वापरायची आणि अतिरिक्त वीज निर्मिती झाली तर ती महावितरणला विकायची या रूफटॉप सोलार योजनेला महावितरणच्या ग्राहकांची वाढती पसंती मिळत आहे. लातूर जिल्हयातील ३ हजार १९७ वीज ग्राहकांकडून जानेवारी महिन्यात १३ कोटी ३७ लाख ५९१ युनीटच्या वीज निर्मितीचा टप्पा गाठण्यात आला आहे.
या ग्राहकांना वीजबिलांपासून मुक्ती मिळाली असून ते केवळ वापर करणारेच नाही तर वीजनिर्मातेही झाले आहेत. या योजनेचा शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील वीजग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री सुंदर लटपटे यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या वतीने नुकतीच प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू केली, ज्याचे उद्दिष्ट १० दशलक्ष कमी आणि मध्यम-उत्पन्न कुटुंबांना रूफटॉप सोलर पॅनेल प्रदान करण्याचे आहे. त्याअनुशंगाने सौरऊर्जा निर्मितीसाठी रूफ टॉप सोलर योजनेत ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदानही उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के आणि ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर सामुहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना २० टक्के अनुदान देण्यात येते.
लातूर जिल्हयातील वीजग्राहकांनी छतावरील सौरऊर्जा निर्मितीला मोठयाप्रमाणावर पसंती दर्शवली आहे. एकूण ३ हजार १९७ वीजग्राहकांनी विविध एजन्सीच्या सहाय्याने ३६ हजार ८८२ किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा निर्मितीचे संच स्थापीत केलेले आहेत. यामध्ये उच्चदाब वर्गवारीतील ३४ वीजग्राहकांचा समावेश आहे. तसेच लघुदाब वर्गवारीतील २ हजार ३६८ घरगुती, ५२० व्यावसायिक, ७५ औद्योगिक तर इतर वर्गवारीतील २०० वीजग्राहकांचा समावेश आहे.
सौरऊजेतून निर्माण होणा-या वीजेमुळे ग्राहकाला नेहमीचा वीजपुरवठा कमी वापरावा लागतो व वीजबिलात कपात होते. ग्राहकाच्या सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते व कंपनी त्या विजेच्या मोबदल्यात वीजबिलात सवलत देते. यातून कधी कधी ग्राहकांना शून्य रकमेचे वीजबिलही येते. सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो पण त्यांचा उपयोग पंचवीस वर्षे होत राहतो. यामुळे ही योजना लोकप्रिय झाली आहे. महावितरणने रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा स्थापित करण्यासाठी परिमंडलनिहाय एजन्सीची नियुक्ती केली आहे. त्याची यादी व ऑनलाईन अर्जाची सोय महावितरणच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीजबिलात मोठी बचत होते. तसेच नेट मिटरिंगद्वारे महावितरणकडून वर्षाअखेर शिल्लक वीज देखील विकत घेतली जाते. त्यामुळे वीज ग्राहकांसाठी फायद्याची असणा-या व पर्यावरणला हातभार लावणा-या या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन लातूर परिमंलाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.