लातूर : प्रतिनिधी
राज्य शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित महासंस्कृती महोत्सव, तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या विभागीय १०० वे नाट्यसंमेलन सुरु आहे. या निमित्त ११ फेब्रुवारी पूर्वरंग, १२ फेब्रुवारी नाट्यदिंडी आणि इतर कार्यक्रम झाल्यानंतर दि. १३ फेब्रुवारी रोजी या महासंस्कृती महोत्सवाची उद्घाटन झाले. उद्घाटन समारंभात नाट्यसंमेलन स्मरणिकेचे प्रकाश करण्यात आले. स्मरणिका सर्वांच्या हातात पडली आणि स्मरणिकेतील चुका सर्वांच्या समोर आल्या. स्मरणिकेत शुभेच्छा संदेश देण्यात आले. मात्र यात नाव एकाचे आणि फोटो दुस-याचा, अशा अक्षम्य चुका झालेल्या आहेत.
राज्य शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित महासंस्कृती महोत्सव, तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या विभागीय १०० वे नाट्यसंमेलनाच्या नियोजनात असंख्य चुका झालेल्या आहेत. नाट्यदिंडीपासून ते उद्घाटनापर्यंत नियोजनात उडालेला गोंधळ अद्यापही थांबलेला नाही. मुंबई-पुण्याच्या कलावंंतांचा भरणा असलेल्या या उपक्रमात स्थानिक कलावंतांना कसलेही स्थान दिले गेले नाही. आता स्मरणिकेत मोठया चुका झाल्या आहेत. क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोड यांची स्वाक्षरी असलेल्या शुभेच्छा संदेशाच्या पानावर उद्योग मंत्री उदय सामंत यांचा फोटो छापण्यात आला आहे. या स्मरणिकेच्या संपादक महोदयांना मंत्री संजय बनसोडे, मंत्री उदय सामंत माहित नसावेत काय? वर्तमान पत्रातील चुकांच्या अनुषंगाने खुप पुर्वी ‘संपादकांची डुकली’, असे सदर यायचे आता स्मरणिकेच्या संपादकांनी एवढी मोठी चुक केलीच तर त्यासाठी आता ‘संपादकांची साखर झोप’, असे सदर सुरु करावे काय?, अशी मिश्कील टिका उद्घाटनस्थळी ऐकावयास मिळाली.