27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeसंपादकीय विशेषउत्कट प्रेमभावनांचा दिवस

उत्कट प्रेमभावनांचा दिवस

मनातील प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी खरंतर कोणत्या तरी विशिष्ट दिवसाची आवश्यकता असते का? प्रेम हे सातत्याने आपल्या मनातून उचंबळतच असतं. कधी ते व्यक्त होतं तर कधी अव्यक्त राहतं. असं अव्यक्त राहिलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जात असावा. आपल्याकडेही कुसुमाग्रजासारख्या प्रतिभावंतांनी ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ आळवले आहे. दुर्गाबाईंच्या ‘पूर्वा’ पुस्तकाचा संदर्भ मनातून जात नाही. पूर्वातील एक एक कथा, एका एका प्रेममयी वेदनेचं उत्तम उदाहरण आहे. वात्सल्य, प्रेम, प्रणय या भावनात्रयीत एक अस्पष्ट तरल रेषा आहे. इतक तरल की या तरल रेषेच्या प्रवासातील टप्प्याटप्प्यावर या कथा आपल्याला नेतात.

न्हा एकदा Þॠतुबदलांचे प्रहर आणि मनाची संभ्रमित अवस्था. माघाचे दिवस म्हणजेच फेब्रुवारी महिना! एरवी माघाचा महिना म्हटलं की आठवते ती माघीपौर्णिमा, महाशिवरात्री , श्री गजाननमहाराज प्रगटदिन. हवा बदलती आहे, थंडी संपू म्हणता म्हणता पावसानं तिला धरून ठेवलंय. दिवसा वाहणारे थंड आणि शितल वारे उन्हाचा तडाखा जाणवू देत नाहीत. एवढ्यातच दुर्गाबाई भागवतांचं ‘पूर्वा’ वाचण्यात आलं आणि भानं आलं ते १४ फेब्रुवारीचं. पण गेल्या काही वर्षापासून तरूणाईत या दिवसाला एक वेगळं आणि अनन्यसाधारण लाभलेलं आहे. ‘१४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून प्रसिद्धीस आला. कुणा एका पाश्चात्य संताच्या इच्छेनुसार त्याचा जन्मदिवस हा प्रेमदिवस म्हणून जगभरात साजरा करावा, किती रम्य कल्पना! म्हणतात ‘इफ यू लव्ह समबडी , लेट देम नो!’ मग काय? त्या संताला कदाचित हे माहीत असावं. म्हणूनच त्यांनी आपला जन्मदिवस हा प्रेमदिवस म्हणून साजरा करावा अशी इच्छा व्यक्त केली. कारण लोक वर्षानुवर्षे प्रेम करतात, पण व्यक्त करत नाहीत. त्यात काय सांगायचं? पे्रम काय शब्दातूनच व्यक्त करावं लागतं? ते तर असतंच असतं. समजावून घ्यावं बस्स! असा सर्वसाधारण नियम पूर्वी होता. आज परिस्थिती बदलली अणि प्रेमाला व्यक्त होण्याची गरज भासू लागली.

एका संताच्या दयेनं ठराविक दिवस म्हणजेच १४ फेब्रुवारी मुक्रर झाला आणि सर्वानुमते गेल्या काही वर्षापासून हा दिवस साजरा होऊ लागला. अर्थात जो तो आपआपल्या पद्धतीनं अर्थ काढू लागला. क्रमवारीनं त्यात काही चांगल्या तर काही वाईट गोष्टींची भर पडली. दुर्गाबाईंच्या ‘पूर्वा’ पुस्तकाचा संदर्भ मनातून जात नाही. पूर्वातील एक एक कथा, एका एका प्रेममयी वेदनेचं उत्तम उदाहरण आहे. वात्सल्य, प्रेम, प्रणय या भावनात्रयीत एक अस्पष्ट तरल रेषा आहे. इतक तरल की या तरल रेषेच्या प्रवासातील टप्प्याटप्प्यावर या कथा आपल्याला नेतात. दुर्गाबाईंचं निसर्गावरील प्रेम, त्यावर मानवी भावभावनांचं रोपण आपल्याला अगदी निसर्गाच्या समीप नेतं. मग पुन्हा तुकोबाराय आठवतात ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ म्हणत ! आपल्याकडील सारीच थोर मंडळी विवावर प्रेम करणारी आहे. तीच शिकवण त्यांनी आपल्या वागण्याबोलण्यातून, साहित्यातून जनमानसात पोचवली आहे. मी-तू पणाचं गळलं बंधन ! ‘अवघे विश्वची माझे घर’ असं असताना या प्रेमाच्या अभिव्यक्तिसाठी खरंच का व्हॅलेटांईन डे चं प्रयोजन लागतं? उत्तर अपेक्षित नाही ! कारण प्रश्नाला प्रतिप्रश्न उठणारच.

आपण आज विराट प्रेमावर आपण बोलू. जरा वेगळं काहीसं हळवं होऊ. कारण आज मनात दुर्गाबाईंचा विचार पिंगा घालतोय. त्यांच्यासोबत कुसुमाग्रज पण येऊ लागलेत. त्यांच्या कवितेतून अंतरिक्षातील प्रेमाची प्रचिती येते. त्यांच्या ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ या कवितेत सूर्य आणि धरेच्या अद्भूत प्रेमकथेचा मिलाफ आहे. अतिशय उत्कट आणि पराकोटीचा समजूतदारपणा याचं हृ्दयगम्य चित्रण आहे. भास्कराचं प्रेम पृथ्वीवर आहे क नाही याविषयी संदिग्धता आहे. ती धुसर आहे पण पृथ्वीचं मात्र त्याच्यावर अतोनात आणि मनस्वी प्रेम आहे. ती त्याच्या कक्षेत युगानुयुगे फिरतेय, याचना करतेय, विनवणी करतेय, आपल्यासाठी किती ग्रह तारे उत्सुक आहे ते भास्कराला सांगतेय. पण ती लाचार नाही,ती चिरविरहिणी आहे.

ती त्याला म्हणते, ‘अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन् मला ज्ञात मी एक धुलीकण, परी अलंकारिण्या पाय तुझे , धुळीचेच आहे मला भूषण’. जे आपल्याजवळ आहे ते सच्चे आहे, पवित्र आहे, मनापासूनचे आहे, तेच मी तुला देईन ते तू मनापासून स्विकार. हृदयाच्या आतील गाभ्यापासून ही माझी इच्छा आहे, आर्जव आहे. मनाची असोशी आहे, तहान आहे. पण लाचारी नाही. तुझी दया नको, भीक नको तर प्रेम हवंय. प्रिती हवीय. नाही मिळाली तर मी तशीच राहीन. तुझी दूरता परवडेल पण दुबळयांचा श्रृंगार नको! ती त्याला रोज पाहते. दूरूनच का होईना निरखत असते. कारण ती त्याच्याच कक्षेत फिरते ना ? किती उच्च कोटीची ही प्रीत, प्रेम! कोणत्या व्हॅलेटांईन डे ला सूर्य तिची ही प्रेमभावना ओळखून तिला हॅपी व्हॅलेंटाईन डे म्हणेल आणि प्रपोज करेल? नाही म्हणणार! कदाचित म्हणेल. सारंच काही संदिग्ध! अशी ही माणसं आपल्याकडे होती. आहेत आणि पुढेही राहणारच. केवळ भारतातच नाही तर जगात अशा प्रेमाची उदाहरणं असंख्य आहेत. काही व्यक्त प्रेमाची तर काही असफल अव्यक्त प्रेमाची.

आज मन भरकटलेलं आहे. व्हॅलेंटाईनची स्वत:ची कथा यापेक्षा वेगळी नव्हती. आपल्यासारखी कोणाची कुचंबणा होऊ नये म्हणूनही कदाचित त्यांनी आपला जन्मदिवस परस्पर प्रेमभावना प्रेमिकांनी व्यक्त करावी म्हणून त्या दृष्टीनं साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली असावी असं वाटतं. पुन्हा कोणी प्रेमाच्या असफलतेने व्यथित होऊ नये असाही महान उद्देश त्यामागे असावा.काही भावना या कालातीत आहे. काळ गूढ आहे. अदृष्य आहे. पण पारदर्शी आहे. त्यात लपलेल्या भाव-भावना निश्चितच दिसतात. कुणा एका ठराविक दिवशीच त्या जाणवतात असं नाही तर कोणत्याही क्षणी त्या आपल्या समोर उभ्या ठाकतात. तरीपण काळाच्या वाहत्या धारेत काही नवीन बदल होऊ लागले आहेत. ते स्विकारले तर आनंद देतात. तोच आनंद आपणही घ्यावा आणि इतरांना द्यावा. म्हणून वाटतं पुन्हा एकदा तरूण व्हावं आणि मनापासून आवडलेल्या व्यक्तीला, व्हॅलेंटाईन डे ला आय लव्ह यू म्हणावं. तेवढाचं आणि तोच आनंदाचा क्षण पुन्हा अनुभवावा. आपणही चकत व्हावं आणि त्यालाही चकित करावं.

-अर्चना कुलकर्णी

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR