23.4 C
Latur
Sunday, November 10, 2024
Homeमहाराष्ट्रसोबत या, पक्षात विलीन व्हा, एकाच चिन्हावर लढू

सोबत या, पक्षात विलीन व्हा, एकाच चिन्हावर लढू

काँग्रेसचा शरद पवारांसमोर मोठा प्रस्ताव

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून भाजपकडून महाविकास आघाडी खिळखिळी करण्यासाठी ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांतील बडे नेते फोडले जात आहेत. भाजपचे हे ‘ऑपरेशन लोटस’ कधी नव्हे इतक्या जोरात सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये किती मातब्बर नेते उरतील, याविषयी शंका निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीचे अस्तित्त्व टिकवण्यासाठी काँग्रेस हायकमांडकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना एक मोठा प्रस्ताव देण्यात आला आहे. शरद पवार यांनी त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन करून काँग्रेससह एकाच चिन्हावर निवडणूक लढवावी, असा काँग्रेस हायकमांडचा प्रस्ताव आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी हा प्रस्ताव शरद पवार यांच्यासमोर मांडल्याचे समजते.

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर रमेश चेन्नीथला, वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम या प्रमुख नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. सद्य राजकीय परिस्थितीबाबत या नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी रमेश चेन्नीथला यांनी शरद पवार यांच्यासमोर त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचा असल्याचा निर्णय दिला होता. तसेच राष्ट्रवादीची घड्याळ ही निशाणीही अजितदादा गटाला बहाल केली होती. त्यामुळे शरद पवार यांच्या गटाने तूर्तास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट हे नाव स्वीकारले आहे. त्यामुळे आता हा गट कायमचा ठेवायचा की काँग्रेसमध्ये जायचे, हा प्रश्न शरद पवार यांच्यासमोर आहे. आता यावर शरद पवार काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली होती. १९६७ साली ते बारामती विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले. यानंतर ते १९९९ पर्यंत काँग्रेस पक्षात होते. यानंतर त्यांनी काँग्रेस नेतृत्वाशी मतभेद झाल्यामुळे बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती.

पुण्यात शरद पवारांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक
पुण्यातील शरद पवारांच्या मोदी बाग या निवासस्थानी महत्त्वाच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीला शरद पवार गटाचे खासदार आणि आमदारही उपस्थित आहेत. या बैठकीत काँग्रेसमध्ये विलीन होण्यासंदर्भातील निर्णय होऊ शकतो. या बैठकीतून बाहेर पडलेल्या शरद पवार गटाच्या मंगलदास बांदल यांनी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत चर्चा सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. हा राष्ट्रीय पातळीवरील विषय आहे. मी लहान कार्यकर्ता आहे. पण तशाप्रकारची चर्चा सुरू आहे, अशी माहिती बांदल यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR