शांघाय : ‘एआय’मुळे आपल्या नोक-या जाणार ही भीती कित्येक दिवसांपासून व्यक्त केली जात आहे. मात्र, ‘एआय’ केवळ नोकरीच नाही, तर छोकरीही घेउन जात असल्याचे चित्र चीनमध्ये दिसून येत आहे. याठिकाणी कित्येक तरुणी पार्टनर म्हणून तरुणांऐवजी ‘एआय’ला पसंती देत आहेत. याला कारण म्हणजे, ‘एआय’ बॉट्स त्यांना अगदी तशीच वागणूक देत आहेत जशी ते आपल्या जोडीदाराकडून अपेक्षा करतात.
चीनमधील टुफेई नावाच्या एका तरुणीने आपला अनुभव शेअर केला आहे. ‘ग्लो’ नावाच्या ऍपवर तिला हा चॅटबॉट बॉयफ्रेंड मिळाला. शांघायमधील मिनिमॅक्स या स्टार्टअप कंपनीने हे ऍप तयार केले आहे. विशेष म्हणजे, हे ऍप अगदी मोफत आहे. चीनमध्ये हजारो तरुण-तरुणींनी हे ऍप डाऊनलोड केले आहे.
महिलांच्या भावना ओळखतो..
टुफेई सांगते, की तिच्या ‘एआय’ बॉयफ्रेंडला महिलांशी कसे बोलायचे याची जाणीव आहे. ख-या तरुणांपेक्षा चांगल्या प्रकारे तो संवाद साधू शकतो. हा ‘एआय’ बॉयफ्रेंड सहानुभूती देतो, तासन्तास गप्पा मारतो. मला तर असेच वाटते की, मी याच्यासोबत रोमँटिक रिलेशनशिपमध्ये आहे.
दुस-या एका तरुणीने सांगितले, की ख-या आयुष्यात एक आयडियल बॉयफ्रेंड शोधणे खूपच अवघड आहे. सर्व लोकांचे स्वभाव वेगवेगळे असतात, त्यामुळे ब-याच वेळा वाद होऊ शकतात. मात्र, ‘एआय’ बॉयफ्रेंडसोबत असे होत नाही.
जगभरात क्रेझ
केवळ चीनच नाही, तर जगभरात अशा प्रकारच्या ‘एआय’ ऍप्सची क्रेझ वाढत चालली आहे. व्हर्चुअल पार्टनर असणारे चॅटबॉट्स लोकांना अधिक पसंत पडत आहेत. अर्थात, यामुळे कित्येकांचे सुरू असणारे संसार मोडले आहेत; तर काहींना तुरुंगाची हवा देखील खावी लागली आहे. त्यामुळे तंत्रज्ञानावर किती विसंबून रहायचे याचा विचार करणे देखील गरजेचे आहे.