नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या राजस्थान राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत हे स्पष्ट झाले आहे. कारण काँग्रेसने राज्यसभेच्या उमेदवारांची जी यादी जाहीर केली आहे त्यात सोनिया गांधी यांचे पहिले नाव आहे.
गेल्या काही दिवसांपासूनच सोनिया गांधी राज्यसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. त्यावर आज काँग्रेसच्या यादीने शिक्कामोर्तब केले आहे. आता लोकसभेचा रायबरेली मतदारसंघ काँग्रेसकडून कुणाला दिला जाणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. या जागेसाठी प्रियंका गांधींचा विचार होऊ शकतो अशीही चर्चा आहे. सोनिया गांधी राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याने त्या लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे राजस्थानमधूनच राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी राज्यसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या रायबरेली या लोकसभा मतदारसंघात कोणत्या काँग्रेस नेत्याला उमेदवारी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या महाराष्ट्रासह १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
राज्यसभेसाठी काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी?
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी : राजस्थान
अखिलेश सिंह : बिहार
अभिषेक मनू सिंघवी : हिमाचल प्रदेश
चंद्रकांत हंडोरे : महाराष्ट्र
सोनिया गांधी या सध्या उत्तर प्रदेशमधील रायबरेलीच्या खासदार आहेत. सोनिया गांधींच्या रायबरेली मतदारसंघातून प्रियंका गांधी आगामी लोकसभा निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता आहे. याबाबत अद्याप कुठलीही घोषणा झालेली नाही. राजस्थानातील ३ जागांवर आणि हिमाचलमधील एका जागेवर राज्यसभेची निवडणूक होणार आहे. आता सोनिया गांधी यांनी राज्यसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी राजस्थानची जागा निवडली आहे.
१३ राज्यांतील ५६ राज्यसभा जागांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे. तर, उर्वरित दोन जागांचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपणार आहे. आंध्र प्रदेश ३, बिहार ६, छत्तीसगड १, गुजरात ४, हरियाणा १, हिमाचल प्रदेश १, कर्नाटक ४, मध्य प्रदेश ५, महाराष्ट्र ६, तेलंगणा ३, उत्तर प्रदेश १०, उत्तराखंड १, पश्चिम बंगाल ५, ओडिशा २, राजस्थान ३ अशा एकूण ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.