30.6 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeमुख्य बातम्याकाँग्रेसला मोठा दिलासा! पुन्हा सुरू केली पक्षाची बँक खाती

काँग्रेसला मोठा दिलासा! पुन्हा सुरू केली पक्षाची बँक खाती

आयटी न्यायाधिकरणाने पुढील सुनावणीपर्यंत बंदी उठवली

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी आयकर विभागाने काँग्रेसची बँक खाती गोठवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. काँग्रेस पक्षाची बँक खाती पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. या संदर्भात काँग्रेस पक्षाचे नेते विवेक तंखा यांनी माहिती दिली.

आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने बुधवारपर्यंत काँग्रेस पक्षाच्या खात्यांवरील फ्रीझ उठवली आहे, याआधी, काँग्रेसचे अजय माकन यांनी दावा केला होता की, लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या काही दिवस आधी २०१८-१९ च्या आयकर रिटर्नच्या आधारे काँग्रेसची अनेक बँक खाती गोठवण्यात आली होती आणि २१० कोटींच्या वसुलीची मागणी करण्यात आली होती.

पुढची सुनावणी बुधवारी होणार
अजय माकन म्हणाले, आम्ही आयकर अपीलीय न्यायाधिकरणात याचिका दाखल केली आहे, त्यावर सुनावणी सुरू आहे आणि आमच्या वतीने ज्येष्ठ वकील विवेक तंखा उपस्थितीत आहेत. बुधवारपर्यंत काँग्रेसच्या खात्यांवरील बंदी उठवण्यात आली आहे. आम्ही आमची बाजू आयकर अपील न्यायाधिकरणासमोर मांडली. आता काँग्रेसची सर्व खाती पुन्हा सुरू करण्यात आली आहेत, पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे.

या आधी पक्षाचे खजिनदार अजय माकन म्हणाले होते की, पक्षाच्या युवा शाखा इंडियन युथ काँग्रेसच्या खातीही गोठवण्यात आली आहेत. आतापर्यंत एकूण नऊ खाती गोठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. अजय माकन म्हणाले, भारतात लोकशाही धोक्यात आहे, १४ फेब्रुवारी रोजी आम्हाला माहिती मिळाली की आम्ही जारी करत असलेले धनादेश बँका स्वीकारत नाहीत. आम्ही चौकशी केली तेव्हा आम्हाला कळले की देशातील प्रमुख विरोधी पक्षाची खाती गोठवण्यात आली आहेत. आता बुधवापर्यंत ही खाती पुन्हा सुरू करण्यात आली आहेत.

काँग्रेस पक्षाची खाती गोठवली गेली नसून देशातील लोकशाही गोठवली आहे, असा आरोपही अजय माकन यांनी केला. गुरूवारी संध्याकाळी भारतीय युवा काँग्रेसची खाती गोठवण्यात आली होती. २०१८-१९ च्या आयकर रिटर्नच्या आधारे २१० कोटी रुपयांची वसुलीची मागणी केली होती, असेही अजय माकन म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR