लातूर : प्रतिनिधी
बाभळगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचा १९ वा दीक्षांत संचालन सोहळा गुरुवार दि. १५ फेब्रुवारी उत्साहात पार पडला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांची यावेळी उपस्थिती होती. प्रशिक्षण काळात उत्कृष्ट कामगिरी करणा-या प्रशिक्षणार्थींना यावेळी चषक, सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य तथा अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अजय देवरे, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सहायक आयुक्त वाघचौरे, प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी नवदीप अग्रवाल यावेळी उपस्थित होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पाटील यांनी प्रारंभी परेड निरीक्षण केले. त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना पोलीस प्राचार्य अजय देवरे यांनी कर्तव्य आणि जबाबदारीबाबत शपथ दिली.
बाभळगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र २००६ पासून कार्यान्वित करण्यात आले असून आतापर्यंत १८ सत्रांमध्ये ८ हजार ३४० प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच १९ व्या सत्रात नवी मुंबई, मिरा भाईंदर, नागपूर आणि पिंपरी चिंचवड येथील ९०९ पोलीस जवानांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून आदर्श आणि संवेदनशील पोलीस घडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अजय देवरे यांनी प्रशिक्षण केंद्राचा अहवाल सादर करताना सांगितले. पोलीस प्रशिक्षण वर्गात उत्कृष्ट कामगिरी करणा-या प्रशिक्षणार्थींचा सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. गोळीबार, बा वर्गामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल साहेबराव बाळासाहेब गाढवे (नवी मुंबई), बा वर्गात द्वितीय क्रमांकासाठी प्रकाश हेतराम उईके (नागपूर), आंतरवर्ग प्रथम योगेश बाळू कदम (मिरा भाईंदर), आंतरवर्ग द्वितीय भीमराव आप्पासाहेब घोरपडे (मिरा भाईंदर), कमांडो वर्ग प्रथम रमेश रामलाल मडावी (मिरा भाईंदर) यांचा चषक देवून सन्मान करण्यात आला. तसेच सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून साहेबराव बाळासाहेब गाढवे यांना गौरविण्यात आले.
पोलीस प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींनी यावेळी आदिवासी नृत्य, लेझीम नृत्य सादर केले. तसेच लातूर पोलीस दलाच्या जवानांनी कमांडो प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडविले. प्रशिक्षणार्थी पोलीस जवानांनी परेड निष्क्रमण संचलन करीत प्रशिक्षण केंद्राचा निरोप घेतला. पोलीस प्रशिक्षण केंद्राचे उप प्राचार्य पोलीस निरीक्षक व्ही. बी. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.