लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर विभागीय मंडळाच्यावतीने लातूर, नांदेड व धाराशिव जिल्हयातील २३८ परीक्षा केंद्रावर ९६ हजार ७९ विद्यार्थी बुधवार दि. २१ फेबु्रवारी पासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा देणार आहेत. शिक्षण मंडळाच्यावतीने तयारी पूर्ण झाली असून परीक्षेतील गैर प्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर विभागीय मंडळाने लातूर जिल्हयातील ९२ केंद्रावर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेसाठी ३७ हजार ६४८ विद्यार्थी बसले आहेत. परीक्षेच्या संदर्भाने माहिती देण्यासाठी लातूर जिल्ह्यासाठी समुपदेशक म्हणून जे. एम. वारद, एम. एस. दानाई, ए. एम.जाधव, एम.एन. वांगस्कर, डी. डी. जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नांदेड जिल्हयातील १०१ केंद्रावर ४२ हजार २८३ विद्यार्थी परिक्षेला बसणार आहेत. तर धाराशिव जिल्हयातील ४२ केंद्रावर १६ हजार १४८ विद्यार्थी परिक्षेला बसणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या भविष्याची परिक्षा म्हणून या परिक्षेकडे पाहिले जाते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांच्या २ ते २० फेब्रुवारी या कालावधीत तोंडी व प्रात्यक्षिक परिक्षा घेण्यात येत आहेत. तसेच २१ फेब्रुवारी व १९ मार्च मध्ये घेण्यात येणा-या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेचे प्रभावी संचलन व गैरप्रकार टाळण्यासाठी सहा भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच कस्टोडियनच्या नियुक्त्याही केल्या आहेत.