मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त झालेल्या सकल मराठा समाजाने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. मराठा समाजाकडून काल राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. अनेक ठिकाणी महामार्ग ब्लॉक करण्यात आले होते. आजदेखील मराठा बांधव आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत.
पंढरपूरकडे येणा-या सर्व मार्गांवर चक्काजाम
सातारा-पुणे या मार्गावरून येणा-या मार्गावर वाखरी चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केल्याने सातारा व पुणे मार्गावरून येणारी शेकडो वाहने अडकून पडली आहेत. गोपाळपूर चौकात केलेल्या चक्काजाममुळे मंगळवेढा आणि कर्नाटकमधून येणारी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. याशिवाय कासेगाव येथे सुरू असलेल्या चक्काजाममुळे कोल्हापूर आणि कोकणातून येणारी वाहतूक थांबली आहे. या रास्ता रोकोमुळे पंढरपुरातून देखील वाहने बाहेर पडू शकत नसल्याने सर्वच मार्गांवर शेकडो एसटी बसेस अडकून पडल्या आहेत. सर्वच ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त असून सर्व ठिकाणी शांततेत आंदोलन केले जात आहे.
दुस-या दिवशीही परभणीत मराठा समाजाचे आंदोलन
परभणीत दुस-या दिवशीही मराठा समाजबांधव आक्रमक झाले आहेत. परभणीच्या सेलू-परतूर महामार्गावरील हदगाव खुर्द येथे रस्त्यावर टायर जाळून आणि जागोजागी काटेरी झुडपे, दगड आडवे लावून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. या मार्गावरची वाहतूक मराठा समाजबांधवांनी बंद केली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
हिंगोली जिल्ह्यात ५०० हून अधिक बस फे-या रद्द
हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव पाटीवर कालपासून रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रशासनाच्या वतीने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप आंदोलकांनी केला आहे. जोपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत आणि हिंगोली या तीनही आगारातील बससेवा बंद आहे. त्यामुळे ५०० हून अधिक बस फे-या रद्द करण्यात आल्या आहेत.
बीड जिल्ह्यात वाहतूक खोळंबली
बीड जिल्ह्यातील परळीत बीड व गंगाखेड रस्त्याला जोडणा-या छत्रपती संभाजी महाराज चौक-इटके कॉर्नर येथे सकाळी दहापासून मराठा समाजाने रास्ता रोको करत चक्काजाम आंदोलन केले. या चक्काजाम आंदोलनासाठी रस्त्यात गाड्या लावून आंदोलकांनी वाहतूक थांबवत राज्य शासनाचा निषेध केला.
नाशिक-मुंबई महामार्गावर रास्ता रोको
नाशिक-मुंबई महामार्गावर आडगावजवळ सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे. नाशिकचे मराठा कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच नाशिक-मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे.