नागपूर : शहरात खुनांचे सत्र सुरू असताना, खून झालेल्या कुख्यात गुंडांच्या टोळींमध्ये गँगवॉर सुरू झाल्याचे चित्र आहे. शुक्रवारी दोन टोळींच्या गुंडांनी व्हीसीए मैदानाजवळ सायंकाळी पाचच्या सुमारास एकमेकांवर हल्ला केला. त्यात पाचपावलीतील भांजाच्या खुनातील आरोपी असलेल्या नाहरकर टोळीतील एक जण जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. दरम्यान अजनीतही अशीच परिस्थिती असल्याचे दिसत आहे.
संजय गजानन सिन्हा (वय २५, नाईक तलाव) असे जखमीचे नाव असून मंगेश चिरोटकर, अक्षय फाटली अशी आरोपींची नावे आहेत. पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पंचकुआ परिसरात प्रेमप्रकरणाचा वाद मिटविण्यादरम्यान धारदार शस्त्रांनी वार करून गुंड अभिषेक ऊर्फ भांजा संजय गुलाबे (वय २३, रा. तांडापेठ) याचा बुधवारी (ता.१४) पहाटे मृत्यू झाला.
याप्रकरणी कुख्यात रोहित सुनील नाहरकर (वय २८), श्याम बाबू कुसेरे (वय ३०) व राजकुमार बंडू लाचलवार (वय २०, सर्व रा. पंचकुआ) या तिघांना अटक केली. दरम्यान शुक्रवारी (ता. १६) त्यांना जिल्हा सत्र न्यायालयात पोलिस कोठडी मिळविण्यासाठी बंदोबस्तात नेले. सुनावणीसाठी नाहरकर आणि भांजाच्या टोळीतील गुंड आले होते. सुनावणीनंतर ते परत जात असताना व्हीसीए मैदानावर दोन्ही टोळीतील गुंड एकमेकांसोबत भिडले.
यामध्ये नाहरकर टोळीतील संजय गजानन सिन्हा (वय २५, नाईक तलाव) भांजाच्या टोळीतील गुंडांनी चाकूने हल्ला करीत जखमी केले. याप्रकरणी सदर पोलिसांनी मंगेश चिरोटकर, अक्षय फाटली आणि आणखी दोन अशा चार जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान येत्या काही दिवसांत या प्रकरणाने शहरात गँगवॉर भडकण्याची शक्यता वाढली आहे