पुणे : पुण्यात तापमान रात्री गार आणि दिवसा उष्ण जाणवत आहे. पुण्यातील रात्रीच्या तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. १७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पुण्यात ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांनी वर्तवला आहे. त्यामुळे पुढील चार दिवस पुणेकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. शहरात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढला आहे. तापमान ३६अंशावर राहण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे.
आयएमडी पुणेच्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांच्या एक्स हँडलवरून मिळालेल्या माहितीनुसार, आज रात्रीपासून (१८ फेब्रुवारी) सक्रिय वारे उत्तर-पश्चिम भारतात धडकण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे १७ ते २० फेब्रुवारी दरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेशात मेघगर्जनेसह हलका/मध्यम पाऊस/बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचा काही भाग सोडला तर पुण्यात पावसाची शक्यता नाही. १८ ते २१ फेब्रुवारी दरम्यान अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात १७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२४ दरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना पुढील काही दिवस उष्णता जाणवणार आहे. राज्यात पावसाची शक्यता आहे पण पुण्यात मात्र उकाडा जाणवणार आहे.