29.6 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्रकोट्यवधींच्या निधीनंतरही स्वच्छतागृहांची दैना

कोट्यवधींच्या निधीनंतरही स्वच्छतागृहांची दैना

एसटीसाठी नव्या तपासणी मोहिमेची घोषणा अस्वच्छता असल्यास आगार व्यवस्थापकांवर कारवाई

मुंबई : प्रतिनिधी
राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या स्थानकांसह त्यातील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी ५०० कोटींहून अधिक निधी उपलब्ध झाल्यानंतरही या स्वच्छतागृहांतील स्वच्छतेचा दर्जा खालावलेला आहे. यामुळे एक मार्च ते ३१ मार्च दरम्यान विशेष तपासणी मोहीम हाती घेण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. यासाठी महामंडळाने १० निकष जाहीर केले असून, त्यानुसार स्वच्छता नसल्यास आगार व्यवस्थापकांवर कारवाई केली जाणार आहे.

ठाण्यातील खोपटमध्ये ५,१५० ई-बस लोकार्पण कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी स्वच्छतागृह, विश्रांतीगृहांची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वच्छतेच्या स्थितीबाबत नाराजी व्यक्त केली. एप्रिलमध्ये सुट्यांचा हंगाम सुरू होणार असल्याने प्रवाशांचा राबता अधिक असण्याची शक्यता आहे. यामुळे मार्चमध्येच एसटी स्थानकांची विशेषत: स्वच्छतागृहांसाठी तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातील अधिकारी-कर्मचा-यांकडून अचानक भेटीद्वारे राज्यातील सर्व स्थानक-आगारांतील स्वच्छतागृहांच्या दर्जाचा आढावा घेण्यात येणार आहे. यांसह एसटी चालक-वाहकांसाठीच्या विश्रांतीगृहातील स्वच्छतागृहांची तपासणीही करण्यात येणार आहे, असे महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सांगितले.

अस्वच्छता असल्यास काळ्या यादीत
स्वच्छतागृहांच्या स्वच्छता, टापटीपपणा यामध्ये कमतरता असल्याचे आढळल्यास संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात येणार आहे. दंडात्मक कारवाई, कंत्राट रद्द करणे, काळ्या यादीसाठी शिफारस अशा प्रकारची कारवाई असेल. तपासणी करणा-या अधिका-यांना कारवाईचे अधिकार आहेत. अस्वच्छ स्वच्छतागृहे आढळलेल्या संबंधित आगार व्यवस्थापकावर शिस्त व अपील कार्यपद्धतीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर एसटी स्थानक मोहिमेनुसार १ मे ते ३१ डिसेंबर २०२३चा अहवाल जाहीर करण्यात आला. मुंबईतील सहा स्थानकांतील स्वच्छता मध्यम स्वरूपाची आहे. ठाण्यात १३ स्थानकांपैकी ८ स्थानके ५० पेक्षा कमी गुण मिळवत नापास झाले. खोपटला स्वच्छतेसाठी ५९ गुण मिळाले.

तपासणीसाठीचे निकष
– स्थानक स्वच्छतागृहांची किरकोळ डागडुजी, नळ-पाण्याची व्यवस्था, परिसराची स्वच्छता व टापटीपपणा
– स्वच्छतागृहातील टाईल्स (फरशी) विशेष अ‍ॅसिड अथवा फिनाईल वापरून डागमुक्त असणे
– स्वच्छतागृहांचे संचालन करण-या संस्थेतील प्रतिनिधींसाठी गणवेश
– स्वच्छतागृहांच्या परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था
– पाण्याच्या साठवणुकीसाठी पुरेशा क्षमतेची पाण्याची टाकी
– स्वच्छतागृहांच्या दाराचे कडी-कोयंडे, पाण्याचा नळ, वापरावयाच्या बादल्या, खिडक्यांची स्थिती
स्वच्छता करत नसतील तर निलंबित करा, मुख्यमंत्री शिंदेंकडून अधिका-यांची कानउघाडणी
– एका स्वच्छतागृहाची ३ वेळा अ‍ॅसिड, फिनाईल वापरून ब्रशने स्वच्छता
– आगार व्यवस्थापकांकडून कार्यक्षेत्रातील स्थानकातील स्वच्छतागृहांची तपासणी
– विभागीय अधिका-यांकडून कार्यक्षेत्रातील आगारांच्या स्वच्छतागृहांची तपासणी
– स्वच्छतागृहांच्या परिसरातील रंगरंगोटीची जबाबदारी संचालन करणा-या संबंधित संस्थेला देणे
५० पेक्षा कमी गुण- १९१ स्थानके
५१-७० गुण -३१७ स्थानके
७० पेक्षा अधिक गुण -५६३ स्थानके

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR