21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रसमृद्धी महामार्गावरील सुरक्षा व्यवस्था वा-यावर

समृद्धी महामार्गावरील सुरक्षा व्यवस्था वा-यावर

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा ठरलेला समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी सुरू झाल्यापासून कायम चर्चेत राहिला आहे. या महामार्गावर सातत्याने अपघात होत असल्याने त्याचीच अधिक चर्चा होते. आता हा महामार्ग वेगळ््याच कारणाने चर्चेत आला आहे. या महामार्गावरील सुरक्षेच्या दृष्टीने सातत्याने काळजी घेतली जायची. त्यासाठी गस्तही वाढविण्यात आली होती. परंतु आता समृद्धी महामार्गावर गस्त घालणारे पोलिस पथक डिझेलअभावी गेल्या १५ दिवसांपासून बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

समृद्धी महामार्गावर अनावधानाने कुठला अपघात अथवा कुठली आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मदत पुरविणा-या पोलिसांच्या वाहनाला डिझेल पुरवठा होत नसल्याने पोलिसांची वाहने गेल्या १५ दिवसांपासून जागेवरच उभी असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना नाईलाजाने समृद्धी महामार्गावर कुठला अपघात झाल्यास एमएसआरडीसीच्या रुग्णवाहिकेतून प्रवास करावा लागत आहे.

समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेसाठी आणि विहित वेग मर्यादा पाळली जात आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकारने २७ नोव्हेंबर २०२३ रोजी समृद्धी महामार्ग पोलिस सुरक्षा विभागाला १५ वाहने दिली होती. मात्र, आता ही वाहने डिझेलअभावी जागेवरच थांबलेली असल्याने समृद्धी महामार्गाची सुरक्षा धोक्यात आली आहे. अनेक डिझेल पुरवठाधारकांचे देयके थांबल्यामुळे डिझेल पुरवठादार या वाहनांना डिझेल देत नसल्याची प्रथमिक माहिती पुढे आली आहे.

समृद्धी महामार्गावर दिवसाला हजारोंच्या संख्येने वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे अनेक अपघातांच्या घटना देखील घडत असतात. अशावेळी वेळीच मदत मिळणे ही अतिशय महत्वाचे ठरत असते. शिवाय मधल्या काळात समृद्धी महामार्गावर काही लूटपाट झाल्याच्या घटना घडल्याचेदेखील बोलले जात होते. सोबतच या महामार्गावरून काही दिवसांपूर्वीच गो तस्करीचे प्रकरणदेखील समोर आले होते. अशा किती तरी प्रकरणांवर कारवाई आणि तात्काळ मदतीसाठी पोलिसांची महत्वाची भूमिका ठरत असते. मात्र वाहनांना डिजेल उपलब्ध होत नसल्याने आता समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

समृद्धी महामार्गाची सुरक्षा रामभरोसे
समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गस्त घालण्यासाठी पोलिस पथकाची नेमणूक केली होती. तसेच त्यांच्यासाठी गाड्याही उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र, आता पोलिसांची ही वाहने डिझेलअभावी जागेवरच असल्याने समृद्धी महामार्गावरील गस्त गेल्या १५ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गाची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे चित्र आहे.

प्रकल्प महत्त्वाकांक्षी, मग याकडे दुर्लक्ष का?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाचे सातत्याने कौतुक केले आहे. तसेच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प खास लोकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिल्याचा दावाही त्यांनी केला. परंतु अवघ्या काही दिवसांत केवळ डिझेलअभावी पोलिसांची गस्त थांबविली. सुरक्षेची काळजी घेणे महत्त्वाचे असताना राज्य सरकारचे याकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR