पुणे : मनसे नेते राज ठाकरे आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या भेटीसंदर्भात विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भाजपने पक्ष फोडले, घरे फोडली आणि आता राज ठाकरेंना भेटायला गेले आहेत. म्हणजे भाजपला विजयाचा आत्मविश्वास नसल्याचे दिसून येते, तुमच्या प्रश्नात उत्तर दडले आहे, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या भेटीवर केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील शिवाजीनगरमधील शिवजयंती कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार गटातील बड्या नेत्याचा भाजप प्रवेश याबाबतच्या बातमीवर भाष्य केले. याशिवाय विरोधी पक्षांची दररोज चर्चा असते असेही त्यांनी म्हटले. जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासह सगळ्यांची चर्चा रोज असते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
तुम्ही विचार केला पाहिजे, २०० आमदार, ३०० खासदार एवढी मोठी ताकद असली तरी त्यांना आमच्याकडचे लोक हवे आहेत. याचा अर्थ आमच्यामध्ये काहीतरी गंमत आहे ना, आमच्याकडे काही तरी टॅलेंट आहे ना त्याच्याशिवाय एवढी मोठी ताकद असताना आम्ही छोटे पक्ष राहिलेले आहोत तरी ते प्रयत्न करतात म्हणजे काहीतरी दम आहे ना आमच्यात असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.