नांदेड : प्रतिनिधी
दोन गटात किरकोळ वाद होऊन दगडफेक झाल्याची घटना दि. १९ रोजी दुपारी शहरातील पिरबु-हान नगर भागात घडली. यावेळी झालेल्या दगडफेकीत काही वाहनांचे नुकसान झाले. पोलिस अधिक्षकांनी तातडीने घटनास्थळी ताफ्यासह दाखल होत परिस्थिती आटोक्यात आणली.
शहरातील वर्कशॉप भागातून दि. १९ रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास काही तरूण दुचाकी, बुलेट घेऊन पिरबु-हान नगराकडे निघाले. एसटी कॉटरजवळ जाताच ओरडण्याच्या किरकोळ कारणाहून दोन गटात वाद झाला. यानंतर हा वाद वाढल्याने दगडफेक सुरू झाली. यावेळी दोन्ही बाजूने आरडाओरड आणि दगडफेक होताच गोंधळ निर्माण होऊन नागरिकांची धावपळ उडाली.
या दगडफेकीत दुचाकी, एक बुलेट व एका स्कुल बसचे नुकसान झाले. पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षकांनी इतर अधिकारी, कर्मचा-यांच्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल तातडीने दाखल होत परिस्थिती आटोक्यात आणली. सध्या या भागात शांतता असून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. युवक व नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन कोकाटे यांनी केले आहे.