सोलापूर : खासगी अनुदानित शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगातील थकीत त्यांची रक्कम त्यांना मिळणार आहे. मात्र, त्यासाठी शाळेच्या लॉगिनवर ऑनलाइन देयके करावी लागणार आहेत. शाळांमध्ये ही देयके पाठवण्याची लगबग सुरू असून सेवानिवृत्त शिक्षकांचे शाळेकडे हेलपाटे वाढले आहेत.
राज्य शासनाने याबाबतचा आदेश नुकताच जारी केला आहे. सेवानिवृत्त व मृत कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोगातील हप्त्याचे देयक ऑनलाइन सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाच हप्त्यात ही रक्कम देय असून काहीना पहिला हप्ता मिळाला आहे. दुसरा, तिसरा आणि चौथ्या हप्त्याची देयके ऑनलाइन पाठवण्याचे काम सुरू आहे. पाचवा हप्ता देण्याबाबत आदेश नाहीत. मृत कर्मचाऱ्यांचे पाच हप्त्यांपैकी उर्वरित देयक ऑनलाइन सादर करून त्यांच्या वारसदारांना एकाच हप्त्यात रोखीने अदा करण्यात येणार आहेत. शाळांनी ही देयके शालार्थ प्रणालीमध्ये फॉरवर्ड करून प्रथम अॅप्रूव्ह करून घ्यायची आहेत. त्यानंतर ती फॉरवर्ड केली जाणार आहेत. त्याही शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हप्त्याची रक्कम प्रलंबित राहू नये अथवा जादा हप्ते संबंधितांच्या खात्यावर जाऊ नयेत याची खबरदारी मुख्याध्यापकांना घ्यावी लागणार आहे.
सेवानिवृत्त शिक्षकांना कसलीही तसदी न देता त्यांना सेवा दिली पाहिजे. सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्याची रक्कम मिळण्यासाठी त्यांनी कोणाकडेही अर्ज करण्याची गरज नाही. ही जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची आहे. ज्या सेवानिवृत्त अथवा मृत कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे हप्ते थकीत आहेत त्यांची शाळेच्या लॉगिनवर ऑनलाइन भरावी लागणार आहेत. यासाठी १५ फेब्रुवारीची अंतिम मुदत होती. अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयाकडून ती अॅप्नुव्ह झाल्यानंतर पगार बिल जनरेट करावे लागेल त्यानंतर ही देयके अंतिम मंजुरीसाठी फॉरवर्ड करावी लागतील. कोणत्याही कर्मचाऱ्यांचे देयक अडवता येणार नाही.