बार्शी : कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे संस्थापित श्री. शिवाजी शिक्षण प्रसार मंडळ, बार्शी संचलित वखारिया विद्यालय, उपळे (दुमाला) येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले श्री. दयानंद रेवडकर सर यांना त्यांच्या क्रीडाक्षेत्रातील व सामाजिक कार्याबद्दल युगदर्शक बार्शी आयकॉन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. माजी मंत्री दिलीप सोपल व आदर्श सरपंच भास्कर पेरे-पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देवून मुख्याध्यापक श्री. दयानंद रेवडकर सर त्यांच्या पत्नी तथा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षिका सौ.ज्योती रेवडकर मॅडम यांचाही सत्कार करण्यात आला.
यशवंतराव चव्हाण सभागृह, बार्शी येथे आयोजित युगदर्शक राज्यस्तरीय आयकॉन पुरस्कार (२०२४) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री दिलीप सोपल व आदर्श सरपंच तथा वक्ते भास्कर पेरे-पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून खासदार ओमराजे निंबाळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, तहसीलदार एफ. आर. शेख, बार्शी शहर पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब खारे,शिवाजी शिक्षण संस्थेचे जयकुमार शितोळे, अण्णासाहेब पेठकर, बप्पा कसबे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापक श्री. दयानंद रेवडकर सर कष्टाळू, प्रामाणिक व्यक्तिमत्व आहेत. त्यांचे वडील कै. रेवडकर आण्णा कर्मवीर मामांच्या सहवासात संस्थेत विश्वासू सदस्य म्हणून कार्यरत होते. श्री दयानंद रेवडकर बी .पी .एड. शिकत असतानाच त्याचे वडिलांचे छत्र हरपले. त्यावेळी संस्थेने त्यांना क्रीडा शिक्षक म्हणून 1997 रोजी रुजू करून घेतले तेव्हापासून त्यांनी आजतागायत उत्कृष्ट कार्य केल्याचे माजी मंत्री दिलीप सोपल यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक रेवडकर यांनी मला आंतरराष्ट्रीय खेळाडू अर्निका गुजर, आंतरराष्ट्रीय कोच आनंद शेलार, आणि स्वप्निल अंधारे, किरण देशमुख, श्री स्वप्निल पवार, ओंकार काळे, ऋषी झालटे, अभय वाघमारे, सचिन नागनाथ रणदिवे, कृष्णा थोरात, दादा शिराळकर ,सुंदरराव लोमटे. येडशीचे समर्थ भोपळे, शरद गवार या सर्वांचे मार्गदर्शन सहकार्य लाभल्याचे सांगितले.
रेवडकर सर भातंबरे, उपळाई (ठोंगे ), महाराष्ट्र विद्यालय बार्शी, येडशी येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत राहिले. या कारकीर्दीत सलग 26 वर्ष उत्कृष्ट सेवा करत मिनी हाफ मॅरेथॉन स्पर्धा प्रमुख, तालुका, जिल्हा, विभागीय स्पर्धेत मार्गदर्शक, रेकॉर्ड कीपर ,पंच म्हणून कार्य, पुणे विभागीय हॉलीबॉल, राज्यस्तरीय हॉलीबॉल, जिल्हास्तरीय बॅडमिंटन, तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत रेकॉर्ड कीपरचे कार्य केले. ईतकेच नव्हे तर ग्रामीण भागात सॉफ्टबॉल, थ्रो बॉल, बॅडमिंटन, जलतरण, बुद्धिबळ, फुटबॉल, योगा या खेळांचा प्रसार करत शालेय स्पर्धांमध्ये तालुका, जिल्हा, विभागीय पातळीवर शाळेला विजेते व उपविजेतेपद, उन्हाळी शिबिरात योग प्रशिक्षक म्हणून ही काम केले. पंचायत समिती बार्शी, लायन्स क्लब रोटरी क्लबतर्फे आयोजित बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग तसेच सामाजिक क्षेत्रात रोग निदान शिबिर, रक्तदान शिबिर आयोजन. ऐच्छिक रक्तदाता म्हणून तीस वेळा रक्तदान केले. सुंदर बार्शी स्वच्छ बार्शी, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आर्थिक मदत केली. रेवडकर सर यांना अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.