मुंबई : मराठा समाजाला शिक्षण आणि नोक-यांमध्ये १० टक्के आरक्षण देणारे विधेयक विधिमंडळात पास करण्यात आले. सरकारच्या या निर्णयानंतर कोणत्या ठिकाणी नोकरी देणार? अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले आहे. शैक्षणिक आणि नोकरीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. परंतु कोणत्या ठिकाणी नोकरी देण्यात येणार हे देखील सरकारकडून सांगितले तर सोन्याहून पिवळे होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मराठा समाजाला सध्या देण्यात आलेले हे आरक्षण कोर्टात टिकले पाहिजे, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्णायक टप्प्यावर आला आहे. मराठा आरक्षण विधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांकडून मंजुरी मिळाली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.