जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यासाठी आवश्यक असणारी सर्व महत्त्वाची कार्यालये एकाच छताखाली यावीत यासाठी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी जळकोट येथे प्रशासकीय इमारतीसाठी तब्बल १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता .यानंतर गतवर्षी या इमारतीचे काम सुरू झाले. जळकोट येथील प्रशासकीय इमारत दोन मजली असून या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे परंतु आंतर्गत कामे गत सहा महिन्यांपासून रेंगाळली आहेत.
गत महिन्यामध्ये या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन होईल व शहरातील सर्व शासकीय कार्यालये या ठिकाणी एकत्र येतील, अशी अपेक्षा होती परंतु अपूर्ण कामामुळे आता ही सर्व प्रक्रिया लांबणीवर गेली आहे. जळकोट हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी विविध शासकीय कार्यालय आहेत परंतु जळकोट शहरातील सर्व शासकीय कार्यालये खाजगी जागेमध्ये सुरू होती. तसेच तहसील व पंचायत समिती कार्यालय एका बाजूला व अन्य शासकीय कार्यालये दुस-या बाजूला असल्यामुळे जळकोट तालुक्यातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत होता यामुळे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी प्रशासकीय इमारतीसाठी १६ कोटी रुपयांच्या प्रशासकीय इमारतीस मंजुरी दिली होती. अंतर्गत फर्निचर, लाईट फिंिटंग, तसेच रंगरंगोटीची ही कामे रखडल्यामुळे या इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळेनासा झाला आहे. या इमारतीमधील अंतर्गत कामे लवकर पूर्ण व्हावी अशी अपेक्षा जळकोट तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांची आहे.