मुंबई : प्रतिनिधी
ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या, त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणारच आहे. परंतु ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत, त्यांच्यासाठी सगेसोय-यांची अधिसूचना काढल्यानंतर त्याची अंमलबजावणी करा, अशी करोडो मराठ्यांची सरकारकडे मागणी होती. परंतु ती मागणी बाजूला सारून स्वतंत्र संवर्गातून मराठ्यांना आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय आहे. मी आता उपचार घेणार नसून, तीव्र उपोषणाला सुरुवात करीत, अशी भूमिका घेत मनोज जरांगे पाटील यांनी हातावरील सलाईन काढले. आम्हाला जे पाहिजे ते आम्ही मिळवणारच, त्यासाठी उद्या आमच्या आंदोलनाची दिशा आम्ही जाहीर करू, असे जरांगे म्हणाले.
राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. एकेकाळी प्रगत असलेला मराठा समाज आता काळाच्या ओघात मागे पडला आहे. शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्याही तो मागे लोटला जात आहे. त्यामुळे या समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण मिळवून देणे हा पर्याय होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळवून द्यायचे हा निर्धार आम्ही केला होता, असे सांगत मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून मराठा समाजाला स्वतंत्र संवर्गातून १० टक्के आरक्षणाचा कायदा मंजूर केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारने दिलेले आरक्षण फसवे असल्याचा आरोप केला.
आम्हाला ओबीसी आरक्षणच हवे
सरकारने मराठा आरक्षणासाठी विधेयक पारित केले, त्याचे आम्ही स्वागत केलेले आहे. परंतु १०० ते १५० जणांसाठी हे आरक्षण आहे. आम्हाला आमच्या हक्काचे ओबीसी समाजातील आरक्षण हवे आहे. आम्ही उद्या आमच्या आंदोलनाची घोषणा करणार आहोत, असे जरांगे यांनी सांगितले.