लंडन : ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याबाबत अमेरिकन पत्रकार टकर कार्लसन यांनी मोठा दावा केला आहे. बोरिस जॉन्सन यांनी मुलाखत देण्यासाठी जवळपास ८ कोटी रुपये मागितल्याचे टकर कार्लसन यांनी म्हटले आहे. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मुलाखतीनंतर टकर कार्लसन यांनी हा दावा केला आहे. गेल्या मंगळवारी ब्लेझ टीव्हीचे संस्थापक ग्लेन बेक यांच्याशी संवाद साधताना अमेरिकन पत्रकार टकर कार्लसन यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मुलाखतीच्या अनुभवाबद्दल सांगितले. यावेळी टकर कार्लसन यांनी बोरिस जॉन्सन यांच्याबाबत दावा केला.
ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी टकर कार्लसन यांना क्रेमलिनचे साधन म्हटले होते. तसेच, ते सतत टकर कार्लसन यांच्यावर टीका करत होते, त्यामुळे टकर कार्लसन यांनी बोरिस जॉन्सन यांची मुलाखत घ्यायची होती. यासाठी त्यांनी बोरिस जॉन्सन यांना विनंतीही केली होती. टकर कार्लसन म्हणाले की, बोरिस जॉन्सन यांचा सल्लागार आपल्याकडे आला आणि म्हणाला की बोरिस जॉन्सन एक मुलाखत देतील, पण त्यासाठी तुम्हाला खूप किंमत मोजावी लागेल, त्यांची एक अट आहे. बोरिस जॉन्सन यांच्या मुलाखतीसाठी दहा लाख डॉलर्स खर्च येईल. बोरिस जॉन्सन मुलाखतीसाठी फी मागत आहेत, ती दिली तरच ते मान्य होतील, असे टकर कार्लसन यांनी ग्लेन बेक यांना सांगितले. तसेच, बोरिस जॉन्सन यांना अमेरिकन डॉलर्स, सोने किंवा बिटकॉइन हवे आहेत, असेही सल्लागाराने सांगितल्याचे टकर कार्लसन म्हणाले. नुकतीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची मुलाखत घेतली होती, पण त्यांनी दहा लाख डॉलर्स मागितले नाहीत असेही टकर कार्लसन यांनी सांगितले.