मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे राजकीय विरोधक अलेक्सी नवाल्नी यांचा गूढ पद्धतीने मृत्यू झाला आहे. त्यामुळे रशियात अंशाततेचे वातावरण आहे. नवाल्नी यांच्या हत्येमागे पुतिन यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातो. पुतिन यांनी आतापर्यंत आपल्या विरोधकांना मारण्यासाठी नोविचोक या विषाचा वापर केल्याचा दावा केला जातो.
नोविचोक हे एक रासायनिक अस्त्र आहे. याच्यावर उपचार नसल्यात जमा आहे. नोविचोकचा रशियामध्ये अर्थ नवागंतूक असा आहे. या विषाचे निदान करणे कठीण मानले जाते. त्यामुळे जेव्हा एखाद्यावर या विषाचा प्रयोग केला जातो, तेव्हा त्याचे वाचणे जवळपास अशक्य असते. नोविचोक नर्व एजेंटला १९७० ते १९८० या काळात विकसित करण्यात आले होते. याला फोलिएंट म्हणून विकसित करण्यात आले होते. नोविचोकचा वापर युद्धादरम्यान केल्याचा आतापर्यंत पुरावा नाही. पण, मार्च २०१८ मध्ये ब्रिटनच्या सैलिसबरी शहकात स्किरपाल आणि त्यांच्या मुलीवर या विषाचा प्रयोग करण्यात आला होता. सुदैवाने दोघे यातून वाचले. त्यानंतर ब्रिटिश सरकारने रशियावर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.
किम जोंगनेही केला विषाचा वापर
अमेरिकेकडे असलेले नर्व एजेंट व्हीएक्स पेक्षा रशियाकडील नोविचोक १० पटीने अधिक प्रभावी आहे. यावरुन याची तीव्रता लक्षात येईल. २०१७ मध्ये उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनी आपल्या सावत्र भावाला मारण्यासाठी अमेरिकेच्या व्हीएक्स विषाचाच वापर केला होता.
अवघ्या दोन मिनिटांत मृत्यू
नोविचोक विषाची बाधा झाल्यास त्याचा परिणाम व्यक्तीच्या मांसपेशीवर होतो. एखाद्या झुरळावर जसा विषाचा परिणाम होतो तसाच त्याचा व्यक्तीवर परिणाम होतो. विष दिले गेलेल्या व्यक्तीला अंग प्रचंड दुखणे, हृदय विकाराचा झटका, श्वास घेण्यास त्रास अशा अडचणी जाणवतात. विष जास्त दिले असल्यास दोन मिनिटात मृत्यू होतो. पण, विषाचे प्रमाण कमी दिले असल्यास मृत्यूला वेळ लागतो. पण, जीव जाताना वेदना नक्की होतात.