नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शेतीमालाला हमीभावाची मागणी करीत केंद्र सरकारविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. दिल्लीकडे कूच करण्यासाठी शंभू आणि खनौरी सीमेवर शेतक-यांनी ट्रॅक्टर जमविले आणि बॅरिकेडिंग हटविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेतकरी आणि पोलिसांत झटापट झाली. यावेळी आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच पोलिसांनी रबरी गोळ््यांचा वापर केला. त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, एका २० वर्षीय आंदोलकांचा मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
विविध मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. या चलो दिल्ली आंदोलनादरम्यान वेगवेगळ््या अफवा पसरताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, आज शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिस आणि शेतक-यांमध्ये झालेल्या संघर्षात एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, जखमींपैकी १० आंदोलकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर इतरांवर शंभू येथील तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या वैद्यकीय शिबिरात प्राथमिक उपचार घेण्यात आले. जखमींपैकी ३ शेतक-यांना पटियाला येथील राजिंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बुधवारी काही शेतकरी पंजाब आणि हरियाणा सीमेला जोडणा-या खनौरी सीमेवरील बॅरिकेड्सकडे जात होते. शेतकरी बॅरिकेड्स तोडून दिल्लीच्या दिशेने कूच करण्याच्या प्रयत्नात होते. शेतक-यांचे हे हिंसक आंदोलन पाहून घटनास्थळी तैनात हरियाणा पोलिस कर्मचा-यांनी मोर्चा सांभाळला. यावेळी शेतक-यांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. तसेच रबरी बुलेटस्ही वापरले.
सरकारचा आमच्या विरोधात प्रचार
शेतकरी नेते जगजीतसिंह डल्लेवाल यांनी सांगितले की, आम्ही पुढे गेलो असता सरकारने आम्हाला चर्चेसाठी निमंत्रण दिले. सरकार आमच्याविरोधात प्रचार करत आहे. २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. दिल्लीला नंतर जाऊ, पहिल्यांदा त्या मुलाप्रती आपली जबाबदारी आहे, जो शहीद झाला आहे, असे म्हटले.