जालना : प्रतिनिधी
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे यांनी आज निर्णायक बैठक बोलावली होती. या बैठकीत २४ फेब्रुवारीपासून राज्यात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय झाला. सरकारला आणखी २ दिवसांची मुदत दिली जाईल. त्यानंतर २४ फेब्रुवारीपासून राज्यभरात प्रत्येक गावात एकाचवेळी रास्ता रोको करण्यात येईल. मात्र, हे सर्व आंदोलन शांततेत करण्याच्या सूचना मनोज जरांगे यांनी बैठकीत दिल्या. रोज सकाळी साडेदहा वाजता हे आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे राज्यात आता गावागावांत आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत.
मराठा समाजाला १० टक्के आरक्षणाची घोषणा करून राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवे आहे. त्यासाठी आता आम्ही २४ तारखेपासून आंदोलन सुरू करणार आहोत. आता आपण फक्त आपले गाव सांभाळायचे, कोणीही तालुक्याला जायचे नाही. यांना आपल्याला जेरीस आणण्यासाठी प्रत्येक गावात आंदोलन करायचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या गावात रास्ता रोको आंदोलन करावे. यावेळी कोणीही जाळपोळ करायची नाही, परीक्षा चालू आहेत. रोज सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यत आंदोलन करायचे. ज्यांना यावेळेत आंदोलन करणे शक्य झाले नाही, त्यांनी संध्याकाळी ४ ते ७ वाजता आंदोलन करायचे. हे आंदोलन रोजच झाले पाहिजे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
राजकीय नेत्यांच्या गाड्या ताब्यात घ्या
शासकीय पदावर असलेल्या आमदार, खासदार मंत्री यांना आपल्या दारावर येऊ देऊ नका, असे म्हणत आमदार आणि मंत्र्यांना अप्रत्यक्षपणे गावबंदी केली जाणार आहे. निवडणूक काळात आलेल्या मंत्री, उमेदवारांच्या गाड्या वापस जाऊ देऊ नका, त्याची जाळपोळ न करता ताब्यात घेऊन निवडणुका संपल्यावर परत करा. निवडणूक आयोगानेदेखील निवडणुका लांबवाव्यात, असे जरांगे पाटील म्हणाले.
वृद्धांनी मैदानात उतरावे
२९ तारखेपर्यंत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी केली नाही तर राज्यातील वृद्ध आणि आमच्या सर्व लोकांनी आमरण उपोषण सुरू करावे. उपोषणादरम्यान एकाचाही जीव गेला तर त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. जगात असे आंदोलन झाले नसेल हे मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांना कळेल, असेही जरांगे पाटील म्हणाले.
राजकारण्यांना इशारा…
रास्ता रोको करताना रस्ता कोणताही असो देणे घेणे नाही. आपल्या भागात रास्ता रोको करायचा. तसेच कोणत्या मुलाला राजकारण्याने त्रास दिला, तर त्यांच्या मदतीला गावांनी जायचे. जाणीवपूर्वक निष्पाप लोकांवर अंदाजे गुन्हा दाखल झाल्यास संपूर्ण गावाने पोलिस ठाणे गाठायचे, असे जरांगे म्हणाले.
३ मार्चला प्रत्येक जिल्ह्यात रास्ता रोको
३ मार्चला पूर्ण राज्यात जिल्ह्याच्या वतीने एकाच ठिकाणी एकच रास्ता रोको करायचा. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांनी त्या ठिकाणी एकत्र यावे. दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत हे रास्ता रोको करायचे, असेही जरांगे म्हणाले.
पक्षाच्या कार्यक्रमाला जायचं नाही
राज्यातील सर्व मराठा समाजाच्या सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर विविध पक्षाचे जिल्हाप्रमुख यांनी आरक्षण मिळेपर्यंत पक्षाच्या कार्यक्रमाला जायचे नाही. मंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार हे कोण-कोण येतात, आपण पाहू, जो आला तो आपला असल्याचे जरांगे म्हणाले.