25.8 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यातून फडणवीस उभे राहिले तरी मीच जिंकणार : आमदार रवींद्र धंगेकर

पुण्यातून फडणवीस उभे राहिले तरी मीच जिंकणार : आमदार रवींद्र धंगेकर

पुणे : पुणे लोकसभा निवडणूक देवेंद्र फडणवीस लढविणार अशी चर्चा सुरू आहे. तर तुम्ही निवडणूक लढविणार का? या प्रश्नावर कसबा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले ‘‘मी ३० वर्षांपासून राजकीय जीवनात आहे. या संपूर्ण कालावधीत कसबा विधानसभा मतदारसंघात विविध प्रभागातून नगरसेवक म्हणून पुणे महापालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्या प्रत्येक निवडणुकीत समाजातील सर्व घटकांनी संधी दिल्याने नगरसेवक म्हणून काम करता आले. त्याच दरम्यान मागील वर्षी झालेली कसबा विधानसभा पोटनिवडणूक सर्वसामान्य नागरिकांनी हातामध्ये घेतल्याने मी आमदार झालो आहे.’’

देशातील लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाकडून बैठका सुरू आहेत. दरम्यान पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून जगदीश मुळीक, मुरलीधर मोहोळ, सुनील देवधर, तर काँग्रेसकडून अरविंद शिंदे, मोहन जोशी, रवींद्र धंगेकर, मनसेकडून वसंत मोरे, साईनाथ बाबर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दीपक मानकर यांच्या नावाची चर्चा आहे. पण निवडणूक ही काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच होण्याची शक्यता आहे.असे असताना पुण्यातून भाजपकडून देवेंद्र फडणवीस लढण्याची शक्यता आहे, अशी राजकीय वर्तुळात जोरात चर्चा सुरू आहे.

धंगेकर पुढे म्हणाले की, आता लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि पुन्हा एकदा माझ्या नावाची या निवडणुकीसाठी चर्चा सुरू झाली आहे. मला काँग्रेस पक्षाने निवडणूक लढविण्याची संधी दिल्यास नक्कीच लढेल आणि जिंकेल देखील, तसेच पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा आहे. पण या सर्व चर्चेवर एकच सांगू इच्छितो, आजवर पुणेकर नागरिक माझ्या पाठीशी राहिले आहेत आणि लोकसभा निवडणुकीत देखील माझ्या पाठीशी राहतील. त्यामुळे पुण्यातून देवेंद्र फडणवीस यांनी लढवावी किंवा त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी ही निवडणुक लढवावी, ही निवडणूक मीच जिंकणार अशी भूमिका मांडत भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR