मुंबई : रवींद्र वायकर, वैभव नाईक, अनिल परब, राजन साळवी यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचा आणखी एक मोहरा तपास यंत्रणेच्या रडारवर आला आहे. खासदार अनिल देसाई यांचे खासगी सचिव दिनेश बोभाटे यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. बोभाटे तपास यंत्रणेच्या फे-यात अडकल्यामुळे अनिल देसाई यांच्याही अडचणी वाढू शकतात.
ईडीकडून आज अनिल देसाई यांचे खासगी सचिव दिनेश बोभाटे यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. दिनेश बोभाटे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्या आधारावरच आता ईडीने बोभाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, विरोधी पक्षातील नेत्यांवर एकापाठोपाठ एक तपास यंत्रणांचा फास अधिकच गडद होत आहे. एकीकडे लोकसभा निवडणुका जवळ आल्या आसतानाच दुस-या बाजूला तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लागल्यामुळे विरोधकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
२ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम बेहिशेबी कमावल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिनेश बोभाटे यांच्या विरोधात १७ जानेवारीला मुंबई कार्यालयात गुन्हा दाखल केला होता. आता ईडीनेही गुन्हा दाखल केला आहे. दिनेश बोभाटे २०१३ ते २०२३ दरम्यानच्या कालावधीत एका इन्शुरन्स कंपनीत असिस्टंट आणि सीनियर असिस्टंट म्हणून काम करत होते. यादरम्यान त्यांनी संबंधित इन्शुरन्स कंपनीत काम करत असताना जवळपास ३६ टक्के बेहिशेबी मालमत्ता कमवल्याचा आरोप केला आहे.