नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. मलिक हे रुग्णालयात दाखल असतानाच सीबीआयने ३० ठिकाणी छापे मारत ही कारवाई केली. मी शेतक-याचा मुलगा आहे, या छाप्यांमुळे मी घाबरणार नाही असे सांगत मलिक यांनी ट्विट केले.
मी गेल्या ३-४ दिवसांपासून आजारी असून रुग्णालयात दाखल आहे, असे असतानाही माझ्या घरावर छापे टाकले जात आहेत. माझ्याकडे (घरात) ४-५ कुर्ते आणि पायजम्याशिवाय काहीही मिळणार नाही, असे सांगत त्यांनी या छाप्यांमुळे आपण घाबरणार नसल्याचे स्पष्ट केले. किरू हायड्रो प्रोजेक्ट प्रकरणी मलिक यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला. यापूर्वी सीबीआयने विमा घोटाळ्याप्रकरणी मलिक यांच्यावर कारवाई केली होती. याआधीही सीबीआयने जम्मू-काश्मीरमधील सत्यपाल मलिक आणि त्याच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापे टाकले होते.
हे छापे टाकून माझा ड्रायव्हर आणि माझ्या सहाय्यकालाही नाहक त्रास दिला जात आहे, असे मलिक म्हणाले. सीबीआयच्या पथकाने मलिक यांच्या घरासह अन्य ३० ठिकाणी देखील छापे मारत कारवाई केली. किश्तवाडमधील किरू जलविद्युत प्रकल्पासाठी २,२०० कोटी रुपयांचे नागरी कामाचे कंत्राट देण्यात कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात २०१९ मध्ये हा छापा टाकण्यात आला होता. २३ ऑगस्ट २०१८ ते ३०ऑक्टोबर २०१९ या कालावधीत जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल असलेले मलिक यांनी या प्रकल्पाशी संबंधित दोन फाईल्स मिटवण्यासाठी ३०० कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप केला होता.
मलिक यांनी लावलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भात सीबीआयने एक एफआयआर दाखल केली होती. चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्स पॉवर लिमिटेडचे माजी अध्यक्ष नवीन कुमार चौधरी आणि इतर माजी अधिकारी एम.एस. बाबू, एम.के. मित्तल आणि अरुण कुमार मिश्रा आणि पटेल यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.