मुंबई : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. आज २३ फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटे ३.०२ मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. दिनांक २१ फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये अॅडमिट केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव माटुंगा पश्चिममाटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील डब्ल्यू ५४ या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळात ठेण्यात येणार आहे. दुपारी २ नंतर अंत्ययात्रा सुरू होईल. दादर स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला. १९९५ या वर्षी ते युतीच्या सत्तेत राज्याचे मुख्यमंत्री होते. मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवर काम केलं आहे. आजारपणामुळे ते गेल्या काही महिन्यांपासून राजकारणात सक्रिय नव्हते. मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते होते. ते बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय होते.