मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर घणाघाती आरोप करणारे त्यांचे एकेकाळचे सहकारी अजय बारसकर यांना हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. अजय बारसकर यांच्या हल्ल्याच्या कटप्रकरणी पाच जणांविरोधात मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदीचे उल्लंघन आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय बारसकर हे ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, त्या हॉटेलबाहेर संशयास्पदरीत्या फिरताना, शुक्रवारी दोघांना ताब्यात घेण्यात आले होते, तर तिघांनी पळ काढला होता. यानंतर आता पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बारसकर यांनी जरांगे यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. मनोज जरांगे यांच्यावर आरोप करणा-या अजय महाराज बारसकरांवर हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळून लावला. कट करणा-या दोघांना पोलिसांनी काल ताब्यात घेतले. बारसकर यांची पत्रकार परिषद होती, पण हल्ला होण्याची त्यांना कुणकुण लागली, त्यामुळे पत्रकार परिषद रद्द केली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. सध्या हे दोघे पोलिसांच्या ताब्यात आहेत. चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.