18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात पुढील दोन दिवस गारठा

राज्यात पुढील दोन दिवस गारठा

पुण्यात सर्वांत नीचांकी तापमानाची नोंद

पुणे : उत्तर भारतात पश्चिमी विक्षोप सक्रिय असल्यामुळे उत्तरेकडून थंड वारे राज्यात येत आहे. त्यामुळे राज्यभरात कमाल-किमान तापमानात सरासरी एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. पुण्यात सर्वांत कमी ११.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिमालयीन रांगांमध्ये आणि शेजारील परिसरात पश्चिमी विक्षोप सक्रिय आहे. त्यामुळे उत्तर भारतातून थंड वारे राज्यात येत आहे. त्यामुळे कमाल-किमान तापमानात सरासरी एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. शुक्रवारी पुण्यात सर्वांत कमी ११.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमान सरासरी १३ ते १४ अंशांवर होते. कोकण-गोव्यात २० अंश सेल्सिअस, विदर्भ आणि मराठवाड्यात किमान तापमान सरासरी १६ अंश सेल्सिअसवर होते. तापमानात झालेली घट पुढील दोन ते तीन दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पुन्हा तापमानवाढीचा अंदाज आहे. आग्नेयेकडून येणा-या वा-यामुळे राज्यात बाष्पयुक्त हवा येत आहे.

विदर्भात सतर्कतेचा इशारा
दक्षिण छत्तीसगड आणि शेजारील प्रदेशात हवेच्या वरच्या स्तरात वा-याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. आग्नेय दिशेने येणा-या वा-यांमुळे राज्यात आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, गोव्यात कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज आहे. सोमवारी, २६ रोजी सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पावसाचा अंदाज आहे. सोमवार आणि मंगळवारी मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली परिसरात हलक्या पावसाचा अंदाज आहे.

धाराशिव, लातूर जिल्ह्यात पाऊस?
मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. रविवार आणि सोमवारी विदर्भात सर्वत्र पावसाचा अंदाज आहे. मंगळवारी, २७ रोजी भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर परिसरात हलक्या पावसाचा अंदाज आहे. सोलापूर आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा फारसा जोर नसेल; मात्र विदर्भात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे हवामान विभागाने विदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR