कौशांबी : उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. स्फोटानंतर लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर भाजले आहेत. जखमींना रुग्णवाहिकेच्या साहाय्याने मांझनपूर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिस आणि ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कोखराज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भरवारी येथील हा कारखाना आहे, जिथे भीषण स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.
कौशांबीचे एसपी ब्रिजेश कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, फटाका कारखान्याला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत, तर काहींची प्रकृती गंभीर आहे. हा कारखाना रहिवासी भागाच्या बाहेर आहे, त्यामुळे रहिवासी भागात कोणतेही नुकसान झालेले नाही. फक्त तेथे काम करणा-या लोकांचा मृत्यू झाला आहे अनेक जण जखमी झाले आहेत. ज्याच्याकडे कारखाना होता त्याच्याकडे फटाके बनवण्याचा आणि विकण्याचा परवाना होता. आगीत ४-६ जण जखमी झाले आहेत.