27.8 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeसोलापूरवाळू माफियांची गुंडगिरी; तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला

वाळू माफियांची गुंडगिरी; तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला

पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक होत आहे. अशा अवैध वाळू उपशावर आळा बसावा यासाठी पंढरपूरचे नूतन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी भीमा नदीकाठावरील विविध ठिकाणांवर धाड टाकत कारवाई करण्यास सुरुवात केली. दरम्यान, आज पहाटे महसूलचे पथक अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गुरसाळे बंधा-यानजीक पोहोचले असता त्या ठिकाणी तहसीलदारांच्या वाहनावर दगडफेक करून हल्ला करण्यात आला. या वेळी ३० ते ४० जणांच्या जमावाने हातामध्ये शस्त्रे घेऊन हल्ला केल्याची घटना घडली आहे.

या घटनेची समजलेली अधिक माहिती अशी की, पंढरपूर तालुक्यात विविध ठिकाणी महसूलच्या पथकांमार्फत कारवाई करण्यात होऊ लागली असतानाच आज पहाटे गुरसाळा बंधा-यानजीक कारवाईसाठी महसूल पथक पोहोचले असता त्या ठिकाणी एक जेसीबी, चार टिप्पर व दोन ट्रॅक्टर आणि काही इसम अवैध वाळू उपसा करताना दिसून आले. महसूल पथक कारवाईसाठी पुढे जाताच त्यांना पाहून वाळू माफियांनी तेथून पळ काढला. १०-१५ मिनिटांमध्ये पुन्हा आपल्या सोबत ३०-४० जणांचा जमाव घेऊन घटनास्थळी ते आले. अनेकांच्या हातात तलवार, कोयते, कु-हाडी, दगड घेऊन सदर जमावाने हल्ला केला. यामध्ये महसूल पथकाच्या वाहनातील तहसीलदारांची गाडी क्रमांक एमएच १३ डीटी १९१३ ची मागील काच फोडण्यात आली.

या प्रकाराने भयभीत झालेले महसूल पथक आपला जीव वाचवण्यासाठी काही अंतरावर पळून गेले व लपले असता महसूल पथक पळून गेलेले पाहताच वाळू माफियांच्या जमावाने आपापली वाहने घेऊन पळ काढला; परंतु एक टिप्पर सुरू न झाल्याने त्याच ठिकाणी सोडून गेले. घडलेल्या घटनेची माहिती पथकातील प्रमुखांनी तहसीलदार सचिन लंगुटे यांना कळवली. दरम्यान, घटनेच्या थोड्याच वेळात तहसीलदार सचिन लंगुटे, अप्पर तहसीलदार तुषार शिंदे, तालुका पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर, महसूलचे खर्डी मंडळ अधिकारी दिलीप सरवदे, बोहाळीचे तलाठी विष्णू व्यवहारे, अमर पाटील, तलाठी सोनके, सुधाकर हिल्लाळ, कोतवाल तावशी, सुधाकर चंदनशिवे कोतवाल खर्डी हे पोलिस पथकासह घटनास्थळी पोहोचले. या वेळी वाळू माफियांनी सोडून गेलेला टिप्पर ताब्यात घेण्यात आला. दरम्यान, या घटनेमुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद काय भूमिका घेणार? महसूल प्रशासन अशा वाळू माफियांबाबत कारवाईची काय भूमिका घेणार? त्यांच्यावर कारवाई होणार का? याकडे आता सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR