25.3 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमुख्य बातम्या२००० च्या नोटा अजूनही बाजारात; लोकांनी दडवले ८,८९७ कोटी!

२००० च्या नोटा अजूनही बाजारात; लोकांनी दडवले ८,८९७ कोटी!

नवी दिल्ली : नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या नोटाबंदीनंतर २ हजार रुपयांची नोट सुरू झाली होती. पण, १९ मे २०२३ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने ही नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली. लोकांना आपापल्या नोटा बँकेत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आता सेंट्रल बँकेच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण नोटा अद्याप सिस्टममध्ये परतल्या नाहीत. ३१ जानेवारी २०२४ पर्यंत २००० रुपयांच्या केवळ ९७.५ टक्के नोटा परत आल्या आहेत. म्हणजेच, अद्याप ८,८९७ कोटी रुपयांच्या नोटा बाजारातच आहेत.

रिझर्व्ह बॅँकेच्या म्हणण्यानुसार २००० रुपयांच्या नोटांच्या चलनात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे ९ फेब्रुवारीपर्यंत चलन परिसंचरण ३.७ टक्क्यांनी घटले आहे. हे एका वर्षापूर्वीच्या ८.२ टक्क्यांपेक्षा खूपच कमी आहे. करन्सी इन सर्कुलेशनद्वारे चलनात असलेल्या नोटा आणि नाण्यांची माहिती मिळते. यामध्ये जनतेकडे उपलब्ध असलेली रोकड आणि बँकांमध्ये पडून असलेल्या पैशांचाही समावेश आहे.

आरबीआयने म्हटले की, २००० रुपयांची नोट काढून टाकल्याने चलनाची गरज कमी होण्यास मोठी मदत झाली आहे. जानेवारी महिन्यात बँकांच्या ठेवींमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. हे २००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याशी ताडून पाहिले जाऊ शकते. रिझर्व्ह मनीही एका वर्षापूर्वीच्या ११.२ टक्क्यांवरून ९ फेब्रुवारीपर्यंत ५.८ टक्क्यांवर घसरली आहे.

दरम्यान, सेंट्रल बँकेने १९ मे २०२३ रोजी २ हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. १९ मे पर्यंत अंदाजे ३.५६ लाख कोटी रुपयांच्या २,००० रुपयांच्या नोटा चलनात होत्या. २३ सप्टेंबर २०२३ पर्यंत ही नोट बदलणे किंवा जमा करण्याचा पर्याय देण्यात आला होता. नंतर ही मुदत ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR