27 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातील वीज यंत्रणा सलाईनवर; कंत्राटी कर्मचारी संपावर

राज्यातील वीज यंत्रणा सलाईनवर; कंत्राटी कर्मचारी संपावर

नागपूर : कंत्राटी वीज कामगारांच्या संयुक्त कृति समितीने कामगारांच्या मागण्यांसाठी २८ फेब्रुवारीपासून दोन दिवस तर ५ मार्चपासून बेमुदत ‘काम बंद’ची हाक दिली आहे. कामगार आयुक्तांच्या उपस्थितीत कामगार संघटना व तिन्ही कंपन्यांची सोमवारी झालेली बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे मंगळवारी (२७ फेब्रुवारी) मध्यरात्री १२ वा. पासून कंत्राटी कामगार संपावर गेले आहेत.

महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांतील कंत्राटी कामगारांनी पहिल्या टप्प्यात २८ फेब्रुवारीपासून ४८ तास व दुस-या टप्प्यात ५ मार्चपासून बेमुदत ‘काम बंद’ची नोटीस तिन्ही कंपनी प्रशासनाला दिली होती. यावरून कामगार आयुक्त संतोष भोसले यांनी २६ फेब्रुवारीला तिन्ही कंपनी व वीज कंत्राटी कामगारांच्या संयुक्त कृति समितीला बैठकीसाठी बोलावले; परंतु, ही बैठक निष्फळ ठरली.

तिन्ही कंपन्यांच्या कर्मचा-यांनी सोमवारी मध्यरात्री १२ पासून संपावर जाण्याची घोषणा केली होती. त्यानुसार हे कामगार काल मध्यरात्री संपावर गेले. कंत्राटी कामगार ४८ तास सेवेवर परतणार नसल्याने या काळात अवकाळी पावसासह काही नैसर्गिक समस्या उद्भवल्यास वीज पुरवठ्यावर परिणामाचा धोका आहे. या आंदोलनानंतरही मागण्या मान्य केल्या नाहीत तर ५ मार्चपासून कंत्राटी कामगार बेमुदत संपावर जाणार आहेत. राज्यातील तिन्ही वीज कंपन्यांमध्ये सध्या ४२ हजार कंत्राटी कामगार कार्यरत आहेत.

मागण्या काय?
तिन्ही वीज कंपन्यांतील रिक्त पदांवर कंत्राटी कामगारांना सामावून घ्या
कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथे नियमित पदभरती करू नका
कंत्राटी कामगारांच्या एकूण पगारात १ एप्रिलपासून ३० टक्के वाढ करा
मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करा
कंत्राटी कामगारांना वयाच्या ६० वर्षापर्यंत कंत्राटदारविरहित शाश्वत रोजगार द्या
कंत्राटी कर्मचा-यांना स्थायीप्रमाणे समान काम समान वेतन द्या व इतर.

कामगारांच्या हक्कासाठी आंदोलन
कामगार आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीतून काहीही ठोस निष्पन्न झाले नाही. त्यामुळे आंदोलन करावे लागत आहे. ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीतील सूचनाही अधिकारी पाळत नाहीत. त्यामुळे ऊर्जामंत्र्यांनी स्वत: लक्ष दिल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. कामगारांच्या हक्कासाठी हे आंदोलन आहे.
निलेश खरात, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (बी.एम.एस.)

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR