पुणे : पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढतानाच दिसत आहे. त्यात रोज नव्या घटना समोर येत आहेत. कधी कोयता घेऊन दहशत माजवली जात आहे तर कधी थेट रस्त्यावर हत्या केली जात आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून रस्त्यावर गाड्यांची तोडफोडदेखील सुरू आहे. त्यातच पुण्यात पुन्हा वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील येरवडा परिसरात हातात कोयते आणि हॉकी स्टिक घेत १० ते १२ वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.
येरवडा परिसरात दहशत माजवण्यासाठी नागरिकांना धमकवत दोन जणांनी वाहनांची तोडफोड केली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांकडून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अजय चित्रगुप्त बागरी, सुमीत भारत सीतापराव अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. मध्यरात्री येरवडा भागात ही घटना घडली आहे.
काही दिवसांपूर्वी येरवडा भागात ५ जणांच्या टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार पुण्यातील येरवडा भागात ५ जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली होती. या संदर्भात ४० वर्षीय महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवर त्वरित अॅक्शन घेत हातात कोयता घेऊन दहशत माजवणा-या अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी अटक केली होती. पुण्यातील येरवडा पोलिस स्टेशनमध्ये सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी आणि या प्रकरणातील आरोपी एकमेकांना ओळखत असून फिर्यादींच्या घरासमोर पार्क केलेल्या वाहनांची कोयत्यांनी तसेच दगडांनी तोडफोड करून नुकसान केले. तसेच परिसरात आरडाओरडा करून जमलेल्या लोकांना ‘तुम्ही या ठिकाणी थांबू नका, नाही तर तुम्हाला देखील सोडणार नाही’ अशी धमकी देऊन हवेत कोयता फिरवून दहशत निर्माण केली होती.