मनमाड : शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची मनमाडमध्ये गुरुवारी रात्री उशिरा गाडी अडवली. यावेळी भीमसैनिकांनी भिडे यांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भीम सैनिकांना ताब्यात घेतले. यावेळी काहींनी संभाजी भिडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्नकेला. या संपूर्ण घटनेचा व्हीडीओ समोर आला आहे.
या संपुर्ण प्रकरणी रात्री उशिरापर्यंत मनमाड पोलिस ठाण्यात भीमसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी भिडे हे गुरुवारी नाशिकच्या येवला येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री उशिरा ते कारने मनमाड मार्गे धुळ्याकडे निघाले असताना मालेगाव चौफुलीवर भीम सैनिकांनी त्यांची गाडी अडवून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी, तर काहींनी भिडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. संबधित घटनेची माहिती मिळताच मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक तातडीने मनमाडमध्ये दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून गोंधळ घालणा-या भीमसैनिकांना ताब्यात घेतले. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर संभाजी भिडे धुळ्याच्या दिशेने रवाना झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत भीमसैनिकांवर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होते. यावेळी भीमसैनिकांनी मनमाड पोलिस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली.