पुणे : बंगालच्या उपसागरावरून येणा-या आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे पुढील तीन ते चार दिवसांत कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भाग आणि मराठवाडा, विदर्भातील काही भागांत विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वा-यासह जोरदार पाऊस, तर काही ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे.
राज्यातील छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, सातारा, जालना, ठाणे रायगड आणि नंदूरबार जिल्ह्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भ मराठवाड्यासह काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. तर, काही ठिकाणी गारपीटही झाली. बुलढाणा, जळगाव आणि मनमाड याठिकाणी गारपीट झाली आहे. आजही मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान पुढील दोन ते तीन तासांमध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, वाशीम, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी गारपीटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर गेल्या २ तासांत नाशिक, जळगाव, बुलढाणा जिल्ह्यांत काही ठिकाणी गारपिटीसह वादळी पावसाची नोंद झाली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
काही भागांत गारपीट?
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार शनिवार आणि रविवार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. याचदरम्यान काही भागात गारपीट देखील होण्याची शक्यता आहे.
कोणत्या जिल्ह्यांत पावसाची शक्यता?
आयएमडीने जारी केलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वा-यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील. छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. याशिवाय विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे.