नवी दिल्ली : गौतम गंभीरने शनिवारी सकाळी अचानक राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला. मुळात लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे. दोन वेळचा वर्ल्डकप विजेत्या भारतीय क्रिकेट टीमचा सदस्य गौतम गंभीर भाजपच्या तिकिटावर पूर्व दिल्लीचा विद्यमान खासदार आहे. गौतम गंभीरने २ मार्च रोजी पोस्ट करून राजकारण सोडण्याबाबत माहिती दिली.
गौतम गंभीरने राजकारणातून निवृत्ती घेण्यामागे क्रिकेटची बांधीलकी हे कारण सांगितले आहे. मात्र, दुसरीकडे पक्ष क्वचितच त्याला उमेदवारी देईल असे अनेक मीडिया रिपोर्टस् समोर आले होते. अशा परिस्थितीत गौतम गंभीरने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा उल्लेख केला आहे.
राजकारणाला रामराम म्हणण्यापूर्वी गौतम गंभीरने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये गंभीरने म्हटले की, मी पक्षाचे माननीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट संदर्भातील काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकेन. मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. जय ंिहद.
निवडणुकांपूर्वी आयपीएलचे आयोजन
या वर्षी देशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तारखा अजून जाहीर झाल्या नसल्या तरीही त्यापूर्वी जगातील सर्वांत मोठी क्रिकेट लीग होणार आहे. इंडियन प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. २२ मार्चपासून सुरू होणा-या आयपीएलमध्ये गौतम गंभीर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने डिसेंबर २०१८ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. क्रिकेटला अलविदा म्हटल्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तो खासदार झाला. मात्र खासदार होऊनही त्याच्यातला क्रिकेटर कधीच लपू शकला नाही.