छ. संभाजीनगर : विधिमंडळाच्या लॉबीत शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात धक्काबुक्की झाल्याची घटना ताजी असतानाच, आता भाजपच्या एका मंत्र्यावर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघाचे भाजप आमदार आणि मंत्री अतुल सावे यांच्यावर हा मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाजप पदाधिका-याकडूनच हा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
विधिमंडळाच्या लॉबीत मंत्र्यांच्या हाणामारीची घटना ताजी असताना आणखी एका मंत्र्याने मारहाण केल्याची तक्रार मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मंत्री अतुल सावेंनी भाजपच्याच एका पदाधिका-याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून, कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारदार आसाराम डोंगर हे मंत्री अतुल सावेंना भेटायल गेले असताना, मंत्र्यांनी ‘तू देवेंद्र फडणवीस व बावनकुळेंच्या संपर्कात राहतोस यावरून मारहाण केल्याचे’ तक्रारीत म्हटले आहे. नुसते मंत्र्यांनीच नाही तर त्यांच्या दोन स्वीय सहाय्यक यांनीही मारहाण केल्याचा आरोप आसाराम डोंगरे यांनी केला आहे. त्यामुळे सावे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी आसाराम डोंगरे यांनी केली आहे.