26.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रदादा गृहखाते मागतील पण मी देणार नाही

दादा गृहखाते मागतील पण मी देणार नाही

बारामती : बारामतीची विकासकामे पाहून मी प्रभावित झालो आहे. दादा मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की, तुम्ही स्वत: लक्ष घालून एवढ्या चांगल्या इमारती बांधल्या. आता मला मोह होत आहे की, आपल्या पोलिस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत, तिथे पीएमसी म्हणून तुम्हालाच नियुक्त करावे. म्हणजे सगळ्या इमारती चांगल्या होतील. अर्थात दादा मला हळूच म्हणू शकतील की, पीएमसी कशाला खातंच माझ्याकडे द्या. पण दादांना खाते देणार नाही, ते माझ्याकडेच ठेवेन, अशी मिश्किल टिपणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

बारामती येथे आयोजित विविध विकासकामांच्या उद्घाटनासह नमो महारोजगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नमो महारोजगार मेळावा हा तरुणांच्या हाताला काम देण्याचा उपक्रम आहे. या माध्यमातून बारामतीत ५५ हजार तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून पश्चिम महाराष्ट्रात बारामतीत हा मेळावा होत आहे. त्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वात बारामतीचे बसस्थानक एअरपोर्टप्रमाणे निर्माण केले आहे. तर कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे पोलिस उपमुख्यालयाची इमारत बांधण्यात आली आहे. हे बांधकाम सरकारी आहे, असे वाटतच नाही. आता माझ्यामागे लोक इथे पोस्टिंग देण्यासाठी लागतील. कारण एवढं चांगल कार्यालय आणि निवासस्थान केवळ बारामतीमध्येच आहेत.

एकत्रित चांगले काम करू
मेळावा जाहीर झाल्यापासून गेले दोन-तीन दिवस माध्यमांना उद्योग लागला. त्यांचे मी आभार मानतो. त्यांनी मेळाव्याला प्रचंड प्रसिद्धी दिली. हा मंच याचा साक्षीदार आहे. एखादे चांगले काम करायचे असेल तर राजकारण बाजूला ठेवत सर्वजण एकत्र येतात. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे नव्या पिढीला आधार देण्यासाठी आम्ही सगळे मिळून चांगले काम करू शकतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महारोजगार मेळाव्याबाबत चाललेल्या वृत्तांवर भाष्य केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR