कराची : पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले राजकीय संकट आज अखेर संपुष्टात आले. पाकिस्तान मुस्लिम लीग (एन)चे ज्येष्ठ नेते शाहबाज शरीफ यांची पुन्हा एकदा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.
रविवारी (३ मार्च २०२४) मतदानानंतर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शाहबाज शरीफ यांच्या रूपाने देशाचे नेतृत्व पुन्हा एकदा शरीफ घराण्याच्या हाती गेले आहे. दरम्यान, इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे नेते उमर अयुब खान यांनी शरीफ यांच्या विरोधात पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला होता.
रविवारी पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधान निवडीसाठी मतदानाला सुरुवात झाली. शाहबाज यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यावर १०० हून अधिक मतांची आघाडी घेतली. शाहबाज शरीफ यांना एकूण २०१ मते मिळाली, तर पीटीआयचे उमर अयुब खान यांना फक्त ९२ मते मिळाली.
यानंतर पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून शाहबाज शरीफ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शाहबाज शरीफ सोमवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.